कोळीवाडे उधाणीच्या रडारवर
परवानगीअभावी धूपप्रतिबंधक बंधारे रखडले
विरार, ता. १९ (बातमीदार)ः वसई किनारपट्टीला निसर्गाच्या प्रकोपापासून वाचवणारे धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी ३० कोटींचा निधी उपलब्ध आहे, पण किनारपट्टी नियमन क्षेत्राची परवानगी नसल्याने कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात कोळीवाड्यांसह किनारपट्टीवरील शेतीला लाटांचा तडाखा बसण्याची भीती वर्तवली जात आहे.
वसई पश्चिमेच्या भागाला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभला आहे. किनारपट्टीच्या भागात एकीकडे मोठ्या संख्येने नागरी वस्ती आहे, तर दुसरीकडे सुरूच्या बागा, किनारी वनस्पतीने भाग नटलेला आहे. या समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. मात्र, किनाऱ्यावर धूपप्रतिबंधक बंधारा नसल्याने किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना अनेक वर्षांपासून विविध समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषतः पावसाळ्यात उधाणामुळे किनारपट्टी भागातील घरांबरोबर शेतीचे नुकसान होते. लाटांच्या तडाख्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत भुईगाव, रानगाव, पाचूबंदर- लांगेबंदर, नवापूर येथे धूपप्रतिबंधक बंधारे तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ३० कोटींचा निधी ही मंजूर आहे. मात्र, किनारपट्टी नियमन क्षेत्राची (सीआरझेड) परवानगी अजूनही मिळालेली नसल्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नसल्याने धोका वाढला आहे.
—-----------------------------------------
प्रशासकीय यंत्रणा उदासीन
पावसाळ्यात समुद्रात मोठ्या उंचीच्या लाटा उसळतात. त्याचा फटका किनारपट्टीला बसतो. तरीही या प्रश्नाला शासन स्तरावरून गांभीर्याने घेतले जात नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मॅकेन्झी डाबरे यांनी केला आहे. याबाबत सतत पाठपुरावा सुरू आहे, परंतु परवानग्या मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात पुन्हा समुद्राच्या प्रकोपाला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे.
—----------------- - —-----------------
सुरूच्या बागांचे अस्तित्व धोक्यात
विविध प्रकारच्या अतिक्रमणामुळे वसईचा हरित पट्टा नष्ट झाला आहे. किनाऱ्याची सुरक्षा भिंत म्हणून काम करणाऱ्या सुरूची झाडे लाटांच्या तडाख्यात नष्ट होऊ लागली आहेत. भुईगावसह अन्य किनार भागात लाटा. वादळी वाऱ्यामुळे हजारो झाडांची पडझड झाली आहे. त्यासाठी धूपप्रतिबंधक बंधारे महत्त्वाचे ठरणार आहेत. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सुरूच्या बागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत
—------------------------------
आराखडा मंजूर
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या मार्फत धूपप्रतिबंधक बंधारे उभारणीचे काम केले जाणार आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाने मे.डी.व्हि.पी. इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा.लि. या कंत्राटदाराच्या न्यूनतम प्रस्तावास मंजुरी प्राप्त झाली होती. त्यानंतर सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशनकडून सागरी पूरसंरक्षक बांधाचा आराखडा मंजूर झाला आहे.
--------------------------
धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामासंदर्भात आराखडा मंजुरीचे काम मार्गी लागले आहे. सीआरझेडची परवानगीसाठी प्रयत्न सुरू आहेत. परवानगी मिळताच पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
- सारंग इनामदार, कार्यकारी अभियंता, रस्ते विकास महामंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.