पापड, कुरडयांचा उद्योग तेजीत
ग्रामीण भागातील महिलांना मिळतोय रोजगार
मुरबाड, ता. १९ (वार्ताहर) : मुरबाड तालुक्यातील ग्रामीण, शहरी भागात तसेच आदिवासी पट्ट्यात घरच्या घरी काही महिला एकत्र येऊन पापड, मिरगुटी, चकल्या, साबुदाणा वडे, कुरडया बनवतात. या महिलांचे बचत गटही आहे. त्या माध्यमातून या महिला सर्व पदार्थांची विक्री करीत असून, त्यातून रोजगारही प्राप्त करीत आहेत.
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हा तसा ग्रामीण व शहरी भाग. येथील ग्रामीण भागात पावसाच्या आधी असंख्य महिला बचत गटांमार्फत विविध प्रकारचे उपक्रम राबवत असतात. पापड, मिरगुटी, कुरडया, खारोड्या, साबुदाणे वडे असे पदार्थ घरगुती पद्धतीने येथे बनवले जातात. उन्हाळ्याच्या काळात ग्रामीण भागात पापड, कुरडया असे असंख्य पदार्थ पारंपरिक पद्धतीने बनवण्याची प्रक्रिया असंख्य वर्षांपासून आहे. हीच प्रथा आता या महिलांसाठी रोजगाराची निर्मिती घेऊन आली आहे. ग्रामीण भागात जागांची कमतरता नसल्यामुळे हे पदार्थ सुकवण्यासाठी मुबलक जागा असते. त्यामुळे हे पदार्थ लवकर वाळवण्यास फार मोठी मदत होते.
आजही ग्रामीण भागात वाळवणाची मोठी परंपरा आहे. विविध कडधान्यांच्या पिठापासून विविध रुचकर पदार्थ तयार केले जातात. त्यात पापड, कुरडया आणि इतर ग्रामीण पदार्थ येतात. पूर्वी हे वाळवणीचे पदार्थ पावसाच्या आधी तयार करून त्याची साठवणूक केली जायची. फक्त आपल्या कुटुंबापुरते ते पदार्थ तयार केले जायचे. पण कालांतराने या गोष्टीकडे रोजंदारीच्या दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले. महिला बचत गटांच्या निर्मितीनंतर या रुचकर पदार्थांची शहरी भागात विक्री होऊ लागली. शहरात आजही ग्रामीण भागातील वाळवणीच्या पदार्थांना मोठी मागणी आहे.
-----------------
रोजंदारीचा नवा पर्याय
मुळात वाळवणीचे पदार्थ करताना खूप मेहनत घ्यावी लागते. हे पदार्थ तयार करण्याची सुरुवातीपासूनची पद्धत खूपच अवघड आहे. त्यामुळे अनेक महिलांचा यात हातभार लागला, की ती गोष्ट सोपी होते. त्यामुळे असे पदार्थ तयार करताना अनेक महिला एकत्रित येतात. यातून त्यांच्यासाठी रोजंदारीचा एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. एकाच वेळी अनेक हात या कामाला लागल्यामुळे पदार्थ बनवण्याची प्रक्रियाही झटपट होेते आणि त्यातून जास्त उत्पादन घेता येते.
----------
परंपरेचे जतन
उन्हाळा म्हटले की घराघरामध्ये वाळवणाच्या पदार्थांचा घाट घातला जातो. त्यात पापड, कुरडया, वडे, मिरच्या, शेवया, फणसाचे गरे अशा विविध पदार्थांचा त्यात समावेश असतो. एवढच नव्हे तर नागली, नाचणी, उडीद तसेच साबुदाण्याचे पापड लाटून वाळवले जातात. वर्षभर पुरेल एवढे उत्पादन या दोन महिन्यांत घेतले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिलांची गरज लागते. बचत गटाच्या माध्यमातून ही प्रक्रिया सोपी झाली असून, ग्रामीण भागातील महिलांनी ही परंपरा जपून ठेवली असल्याचे गृहिणी उमा दत्त यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.