जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली
अवजड वाहन बंदीची अंमलबजावणी ढिसाळ; माहिती फलकांचा अभाव
कर्जत, ता. १९ (बातमीदार) ः कर्जत शहरात वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवार, शनिवार व रविवार अवजड वाहनांना बंदी घातली होती. हे आदेश सध्या केवळ कागदावरच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे विकेंडला कर्जत शहरात मोठ्या प्रमाणात कोंडी होत असून, नागरिकांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-ए (मुरबाड-कर्जत-खोपोली मार्ग)वर शुक्रवार, शनिवार व रविवार या तीन दिवसांत सकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत अवजड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा आदेश जारी केला होता. मात्र, या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. या मार्गावर बंदीसंदर्भात आवश्यक त्या सूचना देणारे फलक लावण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसते. तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या कळंब चौकीसह इतर ठिकाणी बंदीबाबत स्पष्ट सूचना नसल्याने अवजड वाहनचालक अजूनही या मार्गाचा वापर करत आहेत. परिणामी, मागील तीन आठवड्यांपासून शनिवार-रविवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
दरम्यान, कर्जत शहराजवळील उल्हास नदीवरील श्रीराम पूल आणि चारफाटा येथील रेल्वे पूल अरुंद असल्याने या ठिकाणी नित्याचीच वाहतूक कोंडी असते. अशातच, आठवड्याच्या शेवटी पर्यटकांची संख्या वाढल्याने ही समस्या अधिक तीव्र होते. विद्यार्थी, रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवांना याचा फटका बसत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, प्रशासनाने तातडीने स्पष्ट सूचना फलक उभारून, नियमांचे काटेकोर पालन करून घ्यावे व वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
कर्जत शहर बचाव समितीच्या माध्यमातून शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीबाबत प्रशासनाकडे वारंवार मागणी करण्यात आली होती. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन पोलिस व नगर परिषदेमार्फत जिल्हा स्तरावर प्रस्ताव सादर करण्यात आला आणि त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी अवजड वाहनांवर बंदी घालण्याचा आदेश दिला. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेले बंदीचे फलक संबंधित रस्ते विकास महामंडळाकडून लावण्यात आले नाहीत, ही गंभीर बाब आहे. त्यामुळे प्रत्यक्षात आदेशाची पायमल्ली होत असून, परिस्थितीत कोणताही फरक पडलेला नाही. याकडे तातडीने लक्ष न दिल्यास आगामी काळात आंदोलन छेडावे लागेल.
- ॲड. कैलास मोरे, कर्जत शहर बचाव समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.