अक्षय तृतीयेचा उत्साह
सराफा बाजारात सोन्याची झळाळी; वाहन आणि गृहखरेदीलाही उधाण
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १९ : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा उत्साह रविवारी (ता. १९) पनवेल आणि नवी मुंबई परिसरात मोठ्या थाटात पाहायला मिळाला. वाढत्या महागाईचे आणि सोन्याच्या गगनाला भिडलेल्या दरांचे सावट असूनही, नागरिकांनी परंपरेनुसार सोने, वाहन आणि गृहखरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केली होती. यामुळे पनवेलमधील मुख्य बाजारपेठ आणि सराफा बाजार सकाळपासूनच ग्राहकांनी गजबजलेले होते.
शहरातील मुख्य सराफा बाजारात अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सोन्याची झळाळी पाहायला मिळाली. शहरातील सर्वच नामांकित सोन्याच्या पेढ्या ग्राहकांनी ओसंडून वाहत होत्या. सोन्याचे दर सध्या चढे असतानाही, अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जात असल्याने ग्राहकांनी दागिने, सोन्याची नाणी आणि वळींच्या खरेदीला पसंती दिली. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, याच श्रद्धेतून गुंतवणुकीसाठी आणि सण साजरा करण्यासाठी नागरिक सोन्याकडे वळले आहेत, असे मत एका स्थानिक सराफा व्यापाऱ्याने व्यक्त केले.
एकूणच, सोन्याचे वाढलेले भाव आणि आर्थिक आव्हाने असूनही, अक्षय तृतीयेचा सण उत्साहात साजरा केला. बाजारपेठेतील या तेजीमुळे व्यापारीवर्गात समाधानाचे वातावरण असून, सण आणि मुहूर्ताच्या खरेदीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
वाहन बाजारातही तेजी
केवळ सोनेच नव्हे, तर वाहन खरेदीसाठीही आजचा दिवस विशेष ठरला. पनवेलमधील विविध ऑटोमोबाईल शोरूम्समध्ये ग्राहकांची वर्दळ होती. अनेक नागरिकांनी आजच्या मुहूर्तावर दुचाकी आणि तीन चाकी वाहने खरेदी करण्यावर भर दिला. महिनाभरापूर्वीच बुकिंग केलेल्या शेकडो वाहनांची डिलिव्हरी आज ग्राहकांना देण्यात आली. नवीन वाहनांची पूजा करून ती घरी नेण्यासाठी शोरूमबाहेर कुटुंबांची मोठी गर्दी दिसून आली.
गृहखरेदीचा मुहूर्त साधला
रिअल इस्टेट क्षेत्रातही अक्षय तृतीयेचा सकारात्मक परिणाम जाणवला. अनेकांनी आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजचा मुहूर्त साधला. नवीन घरांचे बुकिंग करणे किंवा नवीन घरात गृहप्रवेश करणे, अशा कामांसाठी आजच्या दिवसाला प्राधान्य देण्यात आले. पनवेलमधील बांधकाम व्यावसायिकांनीही या निमित्ताने विविध सवलती जाहीर केल्या होत्या, ज्याचा लाभ ग्राहकांनी घेतल्याचे दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.