स्मशानातील दाहिनीचा कर्णकर्कश आवाज
परिसरातील रहिवासी त्रस्त
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : ठाण्यातील सर्वात जुन्या स्मशानभूमींपैकी एक असलेल्या जवाहर बाग वैकुंठ भूमीत ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिसरातील नागरिक आधीच त्रस्त असताना, अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नातेवाइकांनाही शेवटचा निरोप देताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या स्मशानभूमीत सुरू असलेल्या डिझेलवर चालणाऱ्या दाहिनीमधून येणारा कर्णकर्कश आवाज गेल्या १५ दिवसांपासून वाढला आहे. मशीनचा पट्टा झिजल्यामुळे घर्षणाचा मोठा आवाज होत असून, यामुळे इतका प्रखर आवाज होतो की, नातेवाइकांना तेथे शांतपणे उभे राहणेही कठीण होत असल्याचे नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. एकीकडे प्रदूषण कमी करण्याचे आवाहन करणाऱ्या महापालिकेकडूनच या स्मशानभूमीत अशा प्रकारचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. विशेष म्हणजे, सुमारे पाच-सहा वर्षांपूर्वी एका सामाजिक संस्थेमार्फत या ठिकाणाचे नूतनीकरण करण्यात आले होते. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी तब्बल शंभर फूट उंच चिमणी बसविण्यात आली होती. त्या वेळी कमी धूर निर्माण होईल, असे चित्र निर्माण करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात आजही परिसरातील रहिवाशांना दुर्गंधी आणि वायू प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे.
--------------
ध्वनी प्रदूषणात भर
सध्या डिझेल दाहिनीच्या बिघाडामुळे ध्वनी प्रदूषणाची त्यात भर पडली आहे. मेंटेनन्सचा अभाव आणि ठेकेदारांचे दुर्लक्ष यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. त्यामुळे ‘प्रदूषणमुक्त स्मशानभूमी’ ही महापालिकेची संकल्पना केवळ कागदावरच राहिल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने तातडीने दाहिनीची दुरुस्ती करून ध्वनी व वायू प्रदूषणावर नियंत्रण आणावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.