हॅकाथॉनमधून सोलापूर विकासाला चालना
‘संवेद २०२६’ उपक्रमाचा समारोप; विद्यार्थ्यांच्या कल्पनांना महापालिकेचा पाठिंबा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २० : एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठामध्ये सोलापूर महापालिकेच्या सहकार्याने आयोजित ‘संवेद २०२६’ स्मार्ट गव्हर्नन्स हॅकाथॉनचा उत्साहात समारोप झाला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी सोलापूर शहरातील विविध नागरी समस्यांवर अभिनव आणि व्यवहार्य उपाय सुचवले असून, त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका पुढाकार घेणार असल्याची माहिती सोलापूरचे महापौर विनायक कोंडयाल यांनी दिली.
देशभरातील विविध उच्च शिक्षण संस्था व विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय स्तरावरील हॅकाथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला. अंतिम फेरीतील संघांनी १५ एप्रिलला प्रकल्प सादर केले, तर १६ एप्रिलला प्रदर्शन आणि पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या वेळी महापौर विनायक कोंडयाल, आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अच्युत गोडबोले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
महापालिका आयुक्त डॉ. ओंबासे यांनी विद्यार्थ्यांच्या संकल्पनांचे स्वागत करीत पुढील सहा महिने ते एका वर्षाच्या कालावधीत या कल्पनांना प्रत्यक्षामध्ये रूपांतरित करण्यासाठी आवश्यक आर्थिक व तांत्रिक मदत देण्यात येईल, असे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधीही दिली जाणार आहे.
चौकट
नागरी समस्यांवर तंत्रज्ञानाधारित उपाय
या हॅकाथॉनमध्ये वाहतूक व पार्किंग व्यवस्थापन, रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन अशा महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला होता. देशातील १० राज्यांतील २,७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत ५४६ संघांनी नोंदणी केली. त्यापैकी ७५ संघांची निवड करून त्यांना मार्गदर्शन देण्यात आले, तर अंतिम फेरीत २५ उत्कृष्ट संघांनी स्थान मिळवले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले तंत्रज्ञानाधारित उपाय शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.