डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून दाम्पत्याला ३५ लाखांचा गंडा
नवी मुंबई, ता. २० (वार्ताहर) : मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याची भीती घालून सायबर भामट्यांनी खारघरमधील एका सेवानिवृत्त दाम्पत्याला ३५ लाख ५५ हजार रुपयांना गंडा घातला आहे. या सायबर टोळीने दाम्पत्याला सलग १५ दिवस डिजिटल अरेस्टच्या दहशतीखाली ठेवून ही लूट केली. याप्रकरणी खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू केला आहे.
सेवानिवृत्त दाम्पत्य खारघर सेक्टर ३ परिसरात राहण्यास असून, २५ मार्चला सायबर टोळीने या दाम्पत्यातील महिलेला आयटी विशाल या नावाने संपर्क साधत डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडियामधून बोलत असल्याचे भासवले आणि त्यांच्या नावाने घेतलेल्या एका मोबाईल क्रमांकामुळे कुलाबा पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले. तसेच त्यांचा संबंध टेरर फंडिंग आणि पीएफआय मास्टरमाइंड अब्दुल सलाम याच्याशी असल्याचे सांगून त्यांना भीती घातली आणि त्यांना कुलाबा पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितले.
दरम्यान, महिलेने कुलाबा पोलिस ठाणे येथे जाणे शक्य नसल्याचे सांगितल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याचा गणवेश घातलेल्या आरोपीने या महिलेला व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल करून त्यांना डिजिटल अरेस्ट केल्याचे सांगितले. सायबर टोळीने या दाम्पत्याला दर तीन तासांनी वुई आर सेफ असा मेसेज पाठवण्यास भाग पाडले. तसेच ही माहिती कोणालाही सांगितल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही दिली. १५ एप्रिलला संदेश पाठवून कोणताही प्रतिसाद आला नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी नवी मुंबई सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली.
दरम्यान, याप्रकरणी खारघर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस किंवा कोणतेही सरकारी अधिकारी व्हिडिओ कॉलवर कोणालाही अटक करू शकत नाहीत किंवा बँक खात्याची माहिती मागत नाहीत. अशा फोनला बळी पडू नका आणि तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
अशी झाली फसवणूक
दाम्पत्याचा विश्वास संपादन करण्यासाठी सायबर टोळीने महिलेच्या पतीच्या व्हॉट्सअॅपवर मुंबई पोलिसांचा लोगो असलेली तक्रार, सर्वोच्च न्यायालयाचे पत्र, सीबीआय आणि ईडीची बनावट कागदपत्रे, महिलेच्या नावाचे कॅनरा बँकेचे बनावट डेबिट कार्डदेखील पाठवले. त्यानंतर सायबर टोळीने या दाम्पत्याच्या बँक खात्यातील रक्कम आरबीआय आणि एफआययूकडून तपासणी करून परत करण्याचा बहाणा करीत वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे वर्ग करण्यास भाग पाडले. अशा पद्धतीने २६ मार्च ते १० एप्रिल या कालावधीत या दाम्पत्याने गुगल पे आणि आरटीजीएसद्वारे एकूण सहा व्यवहार करून एकूण ३५ लाख ५५ हजार रुपये आरोपींच्या खात्यात जमा केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.