वावोशीत महसूल सेवा शिबिर
शासन योजनांचा लाभ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
खालापूर, ता. २० (बातमीदार) : महसूल मंडळ वावोशी आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज स्व-समाधान शिबिर’ उत्साहात पार पडले. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ उपलब्ध करून देण्यात आला. महायुती शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत असल्याचे प्रतिपादन उपसभापती भाई शिंदे यांनी केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार अभय चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य रेश्मा पाटील, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, विकास पवार, मिलिंद तिऱ्हेकर यांच्या हस्ते झाले. मंडल अधिकारी सचिन वाघ यांनी शिबिराचे महत्त्व स्पष्ट केले. विविध विभागांनी स्टॉल उभारून जातीचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, ७/१२ दुरुस्ती, नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्र, पीएम किसान नोंदणी आदी सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या.
या वेळी भूमी अभिलेख विभागाकडून तयार करण्यात आलेला वावोशी गावठाण नकाशा ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच विविध योजनांचे मंजुरीपत्र लाभार्थ्यांना देण्यात आले. कार्यक्रमास विजय पाटील, प्रदीप कांबळे, समाधान पाटील, भावेश रावल, माणिक सानप, भरत सावंत, अमोल वाघ, इशिका शेलार यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट
सेवा एका छताखाली
या शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांनी एकत्रितपणे सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय टळली. दाखले, नोंदणी, दुरुस्ती, सामाजिक योजनांचे अर्ज आणि मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळाल्याने वेळ व खर्चाची बचत झाली. अशा शिबिरांमुळे प्रशासन व नागरिक यांच्यातील दरी कमी होत असून, योजनांचा प्रत्यक्ष लाभ तळागाळापर्यंत पोहोचण्यास मोठी मदत होत असल्याचे चित्र दिसून आले.