एपीएमसीत तांदळाची चलती
बासमतीसह इंद्रायणीला मोठी मागणी
बेलापूर, ता. २० (बातमीदार) ः बदलत्या जागतिक परिस्थितीचा परिणाम गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर होताना दिसून येत आहे. याउलट वाशी येथील एपीएमसी बाजारात तांदळाच्या विक्रीवर फारसा परिणाम झाला नसल्याचे आढळून येत आहे. अलीकडेच बासमतीसह तिबार, मोगरा, कोलम, इंद्रायणी तांदळाच्या दरात मोठी वाढ झाली असतानाही ग्राहकांकडून बासमती, मोगरा, इंद्रायणी, कोलम तांदळाची मागणी सर्वाधिक आहे. यामुळे तांदळाच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली असूनही ग्राहकांची मागणी कायम असल्याने बाजारात सध्या तेजीचे वातावरण आहे.
आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि देशांतर्गत पावसामुळे भातशेतीचे झालेले नुकसान याचा थेट परिणाम तांदळाच्या आवकवर झाला आहे. यामुळे एकूण उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. यामुळे बाजारात मालाचा पुरवठा कमी होत असून, दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अल्प पुरवठ्यामुळे दरात १० ते १५ टक्के दराने वाढ झाली आहे. आवक कमी असल्याने मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडले असून, त्याचा थेट परिणाम दरांवर झाला आहे.
चढे दर तरी बाजारात तेजी
साधारणपणे नवीन तांदूळ बाजारात आला की जुन्या तांदळाचे दर स्थिर होतात किंवा कमी होतात. मात्र यंदा नवीन आवक सुरू होऊनही बाजारात मंदीऐवजी तेजीच पाहायला मिळत आहे. व्यापाऱ्यांच्या मते, इंधन दरवाढ आणि वाहतूक खर्च वाढल्याने तांदूळ स्वस्त होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत.
तांदळाचा प्रकार, मार्च महिना (₹) एप्रिल महिना (₹)
बासमती १६० १७५
तिबार ११० १३०
कोलम ६० ६४
इंद्रायणी ६० ६४
मोगरा ५५ ६०
आवक घटली आहे, मात्र मागणी वाढतच चालली आहे. अल्प पुरवठ्यामुळे बासमतीच्या दरात वाढ होत आहे. जुना साठा शिल्लक आहे. त्यामुळे बासमतीच्या दरात तेजी राहणार आहे.
- हर्ष ठक्कर, बासमती तांदळाचे व्यापारी, एपीएमसी धान्य मार्केट, वाशी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.