श्रीवर्धनचा समुद्रकिनारा आता वन पर्यटनाने नटणार
निसर्ग व जैवविविधतेचा होणार जागर
श्रीवर्धन, ता. २० (वार्ताहर) ः श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर आता वन पर्यटन प्रकल्प आकाराला येत असून, यामुळे पर्यावरणपूरक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. जागतिक स्तरावरील ब्लू फ्लॅग मानांकन कायमस्वरूपी मिळवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यामुळे वनसंपदेचे संरक्षण होण्यासोबतच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.
श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग बीच पायलट मानांकन प्रायोगिक तत्त्वावर प्राप्त झाले आहे. हे मानांकन कायमस्वरूपी टिकवण्यासाठी वन विभागाच्या सर्व्हे नंबर ३६० मधील जमिनीवर स्वच्छता व सौंदर्यीकरणाचे काम सुरू केले आहे. या प्रकल्पांतर्गत आकर्षक कमान, सेल्फी पॉइंट आणि निसर्ग-जैवविविधतेची माहिती देणारे फलक लावले जाणार आहेत.
समुद्री वादळांपासून श्रीवर्धन शहराचा बचाव करणाऱ्या सुरूच्या रोपवनांचे संरक्षण करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. भविष्यात येथे वन्यजीव संवर्धन आणि पक्षी निरीक्षणासाठी विशेष सोयी केल्या जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने: पक्षी निरीक्षण (गिधाड, धनेश, समुद्री घार), ऑलिव्ह रिडले कासव संबंधित पर्यटन आणि जनजागृती वाढविण्याच्या अनुषंगाने विशेष प्रयत्न करण्याचे उद्दिष्ट आहे. हे प्रकल्प उपवनसंरक्षक रोहा शैलेंद्रकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीवर्धन वन विभाग वन परिक्षेत्र अधिकारी स्वप्नील चंबुले व टीममार्फत करण्यात येत आहे.
जागतिक स्तरावरील ब्ल्यू फ्लॅग मानांकनाच्या धर्तीवर या समुद्रकिनाऱ्याचा कायापालट करण्यात येत आहे. पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध व्हाव्यात आणि श्रीवर्धनचे पर्यटन जागतिक नकाशावर झळकावे या दृष्टीने ही कामे प्रगतिपथावर सुरू आहेत.
- आदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री
(फोटो - वन पर्यटन प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.