वरले अपघातावरून खरडपट्टी
सुरक्षा नियमांच्या दुर्लक्षावरून आमदारांकडून विचारणा
वाडा, ता. २१ (बातमीदार) ः वाडा-मनोर महामार्गावरील वरले येथे मोरीसाठी खोदलेल्या खड्ड्यात एका व्यक्तीचा पडून मृत्यू झाला होता. या अपघाताची दखल घेताना आमदार शांताराम मोरे यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे.
वाडा-मनोर महामार्गावरील वरले येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ ईगल कंपनीने मोरीसाठी खोदकाम केले आहे. याठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून येथे बॅरिकेड्स अथवा सूचनाफलक लावणे गरजेचे होते; मात्र कंपनीने सुरक्षिततेबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने आलमान येथील रमेश पवारचा आठ ते १० फूट खोल खड्ड्यात पडून मृत्यू झाला होता. या घटनेमुळे कंपनी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. तर आमदार शांताराम मोरे यांनीदेखील घटनास्थळाला भेट देताना अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे.
------------------------------
आंदोलनाचा इशारा
कामाच्या ठिकाणी सुरक्षेबाबत काळजी घेण्याची गरज आहे. तसेच कामाच्या ठिकाणी बॅरिकेड्स, सूचनाफलक लावणे गरजेचे आहे. त्यामुळे दहा दिवसांत सूचनांचे पालन झाले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा मोरे यांनी ठेकेदाराला दिला आहे.