गरिबांना मोफत आरोग्य योजनेचा लाभ
ठाणे जिल्ह्यातील दीड लाखांपर्यंत गरजूंनी घेतला उपचार
ठाणे शहर, ता. २१ (बातमीदार) : महाराष्ट्र शासनाची महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेने वेग घेतला असून ठाणे जिल्ह्यातील लाखो गरीब रुग्णांनी या योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार करून घेतले आहेत. सोबतच केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचादेखील गरीब घटकातील रुग्णांनी मोठा लाभ होत आहे. दोन वर्षांत या दोन्ही योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील गरजू रुग्णांची संख्या १,५४,८७४ एवढी पोहोचली आहे.
राज्यातील गरीब घटकातील रुग्णांना खासगी रुग्णालयातील उपचार परवडत नाहीत. त्यामुळे अशा रुग्णांकरिता केंद्र सरकारने आयुष्मान भारत प्रधानमंत्री आरोग्य आणि राज्य सरकारने महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना सुरू केली आहे. ही योजना खासगी रुग्णालयातसुद्धा लागू होत असून गरिबांना त्यामार्फत चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा मोफत मिळत आहे. या योजनेची माहिती असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील १,५४,८७४ रुग्णांनी एप्रिल २०२४ ते मार्च २०२६ या कालावधीत दर्जेदार आरोग्य सुविधांचा मोफत लाभ घेतला आहे.
दरम्यान, अजूनही अनेकांना या योजनेची माहिती नसून अनेक जण तिचा लाभ घेण्यापासून वंचित राहताना दिसत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांनीसुद्धा समोर येऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी केले आहे. दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयातसुद्धा २४० रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. येथेही शासनाच्या योजनांमुळे अनेक गंभीर आजारांवर मोफत उपचार मिळत आहेत, असे वरिष्ठ जिल्हा समन्वयक डॉ. रवींद्र जगतकर यांनी सांगितले.
------------------
गरीब रुग्णांना लाभ
ठाणे जिल्ह्यात एकूण ४० शासकीय व ११५ खासगी असे सुमारे १५५ रुग्णालये आहेत. सोबतच त्यांच्या जोडीला ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि १२६ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. हे सर्व आरोग्य उपचाराचे ठिकाणे कार्यरत आहेत. त्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या दोन्ही योजनांचा गरीब रुग्णांना लाभ घेता येतो. आरोग्य हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असतानाही अनेक जण अशा योजनांचा लाभ घेताना दिसत नाहीत. अनेकांकडे या दोन्ही योजनांचे कार्ड उपलब्ध नाहीत. अनेकांनी मोबाईल ॲपद्वारे नोंदणी, आधार पडताळणी केलेली नाही. तर ई- केवायसीची माहितीही अनेकांना अजून भरली नसल्याचे विभागाचे म्हणणे आहे. तसेच सरकारी किंवा खासगी रुग्णालयात जाऊन अरुण आरोग्य मित्रांची भेट घेऊन, महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेची नोंदणी करता येते. पिवळे आणि केशरी कार्डधारकांना याचा लाभ मिळतो.
-----------------------------------
शासनाच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना गरिबांनी गरजूंसाठी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये अनेक गंभीर आजारांवरही मोफत उपचार केले जातात. त्यामुळे पात्र नागरिकांनी पुढाकार घेऊन या योजनांचे कार्ड काढायला हवे.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.