अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा
६९ हातगाड्या, सहा टपऱ्या जमीनदोस्त
कल्याण, ता. २१ (बातमीदार) : कल्याण-डोंबिवली महापालिकेने सोमवारी (ता. २०) कल्याण पूर्व परिसरात अनधिकृत फेरीवाले आणि अतिक्रमणांविरुद्ध मोठी कारवाई केली. प्रभाग ५-ड अंतर्गत येणाऱ्या विविध मुख्य रस्त्यांवर जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत टपऱ्या आणि हातगाड्या तोडण्यात आल्या. या धडक मोहिमेमुळे गेल्या अनेक दिवसांपासून गजबजलेल्या रस्त्यांनी अखेर मोकळा श्वास घेतला.
प्रभाग ५ ‘ड’चे सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने चक्की नाका आणि गावदेवी चौक, चेतना शाळा परिसर आणि १०० फुटी रोड जिया वाइन्स आणि रिलायन्स स्मार्ट पॉइंट परिसर, विजयनगर ते आमराई रस्ता, तीसगांव नाका येथील सर्व अतिक्रमणे हटवण्यात आली. पालिकेच्या पथकाने केवळ अतिक्रमणे हटवली नाहीत, तर रस्त्यावर अनधिकृतरीत्या विक्रीसाठी ठेवलेला मालही जप्त केला.
या मोहिमेत एकूण ६९ हातगाड्या, सहा टपऱ्या आणि पाच लोखंडी स्टँड तोडून रस्ते आणि फुटपाथ पूर्णपणे मोकळे करण्यात आले. या कारवाईत अधीक्षक अविनाश ठाकरे, नितीन चौधरी, जयेश काळन, पथकप्रमुख उमेश जाधव, जेम्स कदम यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी आणि पोलिस बंदोबस्त मोठ्या संख्येने तैनात होता. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली होती.
--------------
नागरिकांकडून समाधान
रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांना चालताना होणारा त्रास यामुळे नागरिक त्रस्त होते. पालिकेच्या या धडक कारवाईनंतर सर्वसामान्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांनी नियमांचे पालन करावे अन्यथा यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा पालिके प्रशासनाने दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.