मासळी सुकवणे परवडेना!
डिझेल महागल्याने थेट विक्रीकडे वाढता कल
भाईंदर, ता. २२ (बातमीदार) : आधीच समुद्रात मासळीचा दुष्काळ, त्यात इराण-अमेरिका युद्धामुळे वाढलेले डिझेलचे दर यामुळे मासळी सुकवून तिची बाजारात विक्री करणे मच्छीमारांना परवडेनासे झाले आहे. त्याऐवजी पकडून आणलेली मासळी न सुकवता ती थेट बाजारात विक्री करण्याकडे मच्छीमारांचा कल वाढू लागला आहे.
मासेमारी हंगामाचा अवघा दीड महिना शिल्लक राहिला आहे. पावसाळ्यात मासेमारी बंद झाल्यानंतर खवय्यांना सुक्या मासळीचाच आधार असतो. एप्रिल व मे या दोन महिन्यांत कडक ऊन असल्याने बोंबील, जवळा, करंदी, सोडे अशी मासळी सुकविण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालते. मच्छीमार समुद्रातून पकडून आणलेले पापलेट, सुरमई, घोळ असे मासे विक्रीसाठी बाजारात पाठवतात आणि बोंबील व अन्य छोटी मासळी सुकविण्यासाठी ठेवून देतात. छोट्या मासळीला तीन ते चार वेळा ऊन दिले की ती विक्रीसाठी तयार होते. खवय्येदेखील पावसाळ्याची बेगमी करण्यासाठी बाजारात सुक्या मासळीची या दिवसांत खरेदी करीत असतात.
असे असले तरी सुकी मासळी सध्या विक्रीसाठी येण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. समुद्रात मासळीचा दुष्काळ जाणवत आहे. पापलेट, सुरमईसारखे मासे मिळण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. दुसरीकडे आखातातील युद्धामुळे मच्छीमारांना मिळणाऱ्या डिझेलचे दरही वाढले आहेत. परिणामी डिझेलचा खर्च झेपेनासा झाला आहे. त्यामुळे जाळ्यात आलेल्या थोड्याफार मोठ्या माशांसोबत बोंबील, कोळंबी अशी छोटी मासळी हाताला लागली की ती घेऊन मच्छीमार किनाऱ्याकडे येतात आणि ती सुकवायला न पाठवता थेट बाजारात विक्रीसाठी पाठवत आहेत. त्यामुळे किमान डिझेलचा खर्च तरी निघेल, असा हिशेब मच्छीमार करू लागले आहेत.
------------------
हमालीचा खर्च वाढला
मासळी सुकविण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात. शिवाय किनाऱ्यावरून ती सुकविण्याच्या जागेवर नेण्यासाठी हमालीचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे मासळी सुकविण्यात वेळ घालविण्याऐवजी ओली मासळीच बाजारात नेऊन विकणे सध्या परवडत आहे, अशी माहिती उत्तनमधील मच्छीमार सत्यम नागोरामा यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.