नेरूळ पूर्व-पश्चिम जोडणीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
भुयारी मार्ग, पुलाच्या पर्यायांवर प्रशासनाचा सकारात्मक सूर
जुईनगर, ता. २१ (बातमीदार) : नेरूळ पूर्व आणि पश्चिम विभागाला जोडणारा आणखी एक सुलभ मार्ग निर्माण करावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. या मार्गाअभावी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र प्रशासनाने भुयारी मार्ग तसेच पर्यायी पूल उभारणीच्या प्रस्तावांवर सकारात्मक भूमिका घेतली असून, नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्येच्या समाधानाची आशा निर्माण झाली आहे.
नेरूळमध्ये महत्त्वाची सरकारी कार्यालये पूर्व आणि पश्चिम विभागात विभागली गेल्याने नागरिकांना वारंवार प्रवास करावा लागतो. रुग्णालय, आरटीओ आणि पोलिस ठाणे पूर्वेला, तर विभाग कार्यालय आणि स्मशानभूमी पश्चिमेला असल्याने दैनंदिन कामांसाठी मोठा वळसा घालावा लागतो. सध्या उपलब्ध असलेले दोन पूल एकमेकांपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असल्याने वेळ आणि खर्च दोन्ही वाढतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पादचारी पूल हा एकमेव जवळचा पर्याय असला तरी तो फक्त पादचाऱ्यांसाठी असल्याने विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच अडचणी येतात. वाहनांसाठी पर्याय नसल्याने रिक्षाने जाणाऱ्यांना अतिरिक्त भाडे मोजावे लागते.
नगरसेवक प्रदीप गवस यांनी या समस्येबाबत महापालिका आयुक्तांची भेट घेतल्यानंतर शिरवणे येथील धर्तीवर भुयारी मार्ग उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. आयुक्तांनी तांत्रिक पाहणीचे आदेश दिले असून, आवश्यक असल्यास एस्केलेटरयुक्त आधुनिक पूल उभारण्याचाही विचार सुरू आहे.
चौकट
दैनंदिन जीवनावर परिणाम
नेरूळ पूर्व-पश्चिम जोडणीचा प्रश्न हा केवळ वाहतुकीचा नसून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित आहे. आरोग्य, प्रशासनिक सेवा आणि आपत्कालीन सुविधा वेळेत मिळाव्यात यासाठी जलद व सुरक्षित जोडणी अत्यावश्यक आहे. त्यामुळे भुयारी मार्ग किंवा आधुनिक पूल यापैकी कोणताही पर्याय निवडताना दीर्घकालीन उपयोगिता, सुरक्षितता आणि सर्वसमावेशकता यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. प्रशासनाने दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरून लवकर काम सुरू होणे, हीच नेरूळकरांची प्रमुख अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.