कोपरखैरणेतील उद्यानांची दुरवस्था
नागरिकांमध्ये तीव्र नाराजी
तुर्भे, ता. २१ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील कोपरखैरणे नोडबाबत नेहमीच दुजाभाव केला जात असल्याची भावना स्थानिक नागरिकांमधून वारंवार व्यक्त होत असते. विशेषतः उद्यान विभागाच्या बाबतीत हे दुर्लक्ष अधिक ठळकपणे जाणवत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोपरखैरणे परिसरात एकही सुसज्ज आणि सुविधांनी युक्त उद्यान नसल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
परिसरातील बहुतांश उद्यानांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, सर्वत्र ओबडधोबड जमीन, तुटलेले बाकडे, नादुरुस्त खेळणी, गंजलेली व्यायाम साधने, पाण्याच्या डबक्यांनी भरलेले मार्ग आणि कचऱ्याचे ढिगारे असे चित्र पाहायला मिळत आहे. लहान मुलांसाठी बसवण्यात आलेली खेळणी अनेक ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत असून, त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोय असलेली बाकडी मोडकळीस आलेली आहेत.
उद्यानातील झाडांना नियमित पाणी दिले जात नसल्याने अनेक झाडे कोमेजून गेली आहेत. हिरवळ टिकवण्यासाठी आवश्यक देखभाल होत नसल्याने गवत वाळले असून, अनेक ठिकाणी झुडपे वाढून अस्वच्छता निर्माण झाली आहे. पावसाळा नसतानाही पाण्याची डबकी साचलेली असल्याने डासांचे प्रमाण वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांनी महापालिकेच्या उद्यान विभागाने तातडीने सर्व उद्यानांची पाहणी करून दुरुस्ती, स्वच्छता, नवीन खेळणी, झाडांना नियमित पाणीपुरवठा आणि सुरक्षा व्यवस्था यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी केली आहे. कोपरखैरणेतील उद्याने केवळ नावालाच न राहता खऱ्या अर्थाने नागरिकांसाठी उपयोगी आणि सुरक्षित बनावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.