नवी मुंबईत बेकायदा वाहतूक
प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
वाशी, ता. २१ (बातमीदार) ः नवी मुंबईत बेकायदा रिक्षा व व्हॅन वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाशी, नेरूळ, जुईनगर ते उलवे आणि उरण या मार्गांवर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन रिक्षा आणि व्हॅन सुसाट धावताना दिसत आहेत. या बेकायदा वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढला असून, प्रवाशांच्या जीवाशी अक्षरशः खेळ केला जात आहे.
उलवे परिसरात गेल्या काही वर्षांत झपाट्याने नागरी वस्ती वाढली आहे. मात्र त्या तुलनेत सार्वजनिक वाहतूक सुविधा अपुऱ्या आहेत. नवी मुंबई परिवहन उपक्रमाची बससेवा उपलब्ध असली तरी ती वाढत्या प्रवासीसंख्येला पुरेशी ठरत नाही. परिणामी प्रवाशांना शेअरिंग रिक्षा आणि व्हॅनचा आधार घ्यावा लागतो. तीन आसनी रिक्षांमध्ये पाच ते सहा प्रवासी बसवले जातात, तर दहा आसनी व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबले जातात.
वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन ही या समस्येची गंभीर बाजू आहे. अधिक फेऱ्या मारून जादा उत्पन्न मिळवण्यासाठी रिक्षाचालक वेगाने वाहन चालवतात, सिग्नल तोडतात आणि अनेकदा उलट दिशेनेही वाहन चालवतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक वाढते. विशेषतः नेरूळ ते उरण हा मार्ग जड-अवजड वाहनांसाठी ओळखला जातो. जेएनपीटीकडे जाणाऱ्या कंटेनर वाहतुकीमुळे हा मार्ग आधीच धोकादायक आहे. अशा परिस्थितीत अतिरिक्त प्रवासी घेऊन धावणारी वाहने ही अपघातासाठी निमंत्रणच ठरत आहेत.
प्रवाशांनाही पर्याय नसल्याने या धोकादायक प्रवासाचा स्वीकार करावा लागतो. कामानिमित्त आणि शिक्षणासाठी रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या समस्येकडे वाहतूक पोलिस आणि आरटीओ यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
चौकट
सार्वजनिक सुविधांचा अभाव
उलवे आणि उरण परिसरात वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत बस आणि रेल्वेसेवा अपुऱ्या आहेत. त्यामुळे नागरिकांना बेकायदा रिक्षा आणि व्हॅनवर अवलंबून राहावे लागते.
चौकट
नियमांचे उल्लंघन
क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी, वेगाने वाहन चालवणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे अपघाताचा धोका वाढत असून, प्रशासनाने तातडीने कडक कारवाई करणे आवश्यक आहे.
बॉक्स
या मार्गावर वाहतुकीचे पर्याय कमी असल्याने व्हॅन आणि रिक्षामधून प्रवास करावा लागतो. प्रशासनाने या मार्गावर सार्वजनिक वाहतुकीचे इतर पर्याय सुरू करावेत किंवा या सुरू असलेल्या रिक्षा, व्हॅनमधून कायदा सुरक्षित वाहतूक कशी होईल याकडे लक्ष द्यावे.
- सचिन पाटील, नोकरदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.