मिरा-भाईंदर महापालिका राज्यात तिसरी
ई-ऑफिस क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल
भाईंदर, ता. २१ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेने ई-ऑफिस उपक्रम प्रभाविपणे राबवल्याची दखल राज्य शासनाने घेतली आहे. महापालिकेला राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान स्पर्धेअंतर्गत तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी (ता. २१) मिरा-भाईंदर महापालिकेला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र तसेच रुपये चार लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
राज्यातील एकूण २९ महापालिकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि माहिती-तंत्रज्ञान विभागाचे सिस्टीम मॅनेजर राज घरत यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून प्रशासन अधिक वेगवान, पारदर्शक व नागरिकांभिमुख करण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासनाने ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित केली आहे. अवघ्या ६० दिवसांत सर्व विभागांमध्ये १०० टक्के ई-ऑफिस अमलात आणणारी मिरा-भाईंदर महापालिका महाराष्ट्रातील पहिली पालिका ठरली असून, या उपक्रमाला एनआयसीकडून प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
महापालिकेचे दैनंदिन कामकाज, पत्रव्यवहार, फाईल हालचाल, मंजुरी प्रक्रिया तसेच नोंद व्यवस्थापन पूर्णपणे डिजिटल स्वरूपात या प्रणालीमुळे पार पडत आहे. यामुळे माहिती सुरक्षित, शोधण्यायोग्य आणि तत्काळ उपलब्ध होत असून, कामकाज अधिक सुसूत्र व गतिमान झाले आहे. आतापर्यंत १.४९ लाखांहून अधिक नोंदी तसेच ८,८०० पेक्षा अधिक फाइल्स डिजिटल पद्धतीने हाताळण्यात आल्या आहेत. प्राप्त नोंदींपैकी सुमारे ९० टक्के नोंदींचा निपटारा तीन दिवसांच्या आत होत आहे, तर फाईल निपटारा सरासरी सात दिवसांत पूर्ण केला जात आहे. कागदविरहित प्रणालीमुळे कागद, वेळ व खर्चाची बचत होऊन महापालिकेची सुमारे चार कोटी रुपयांहून अधिक आर्थिक बचत झाली आहे. याची दाखल घेऊन राज्य सरकारने महापालिकेला तिसरा क्रमांक देऊन सन्मानित केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.