चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल समोरासमोर
सीएसएमटीत मोटरमनच्या सतर्कतेने अपघात टळला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे मंगळवारी दुपारी चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल समोरासमोर येण्याची परिस्थिती निर्माण झाली होती; परंतु मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. या गोंधळामुळे सीएसएमटीच्या चारही फलाटांवरील लोकल वाहतूक २५ मिनिटे ठप्प झाली होती. रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत स्थानकप्रमुखास तत्काळ निलंबित केले.
बदलापूरहून दुपारी ३.१८ वाजता येणारी जलद लोकल सीएसएमटीवरील फलाट क्रमांक चारवर येणे अपेक्षित होते; मात्र सिग्नल यंत्रणेतील त्रुटीमुळे तिला फलाट क्रमांक पाचचा सिग्नल देण्यात आला. त्याच वेळी फलाट क्रमांक पाचवर खोपोली लोकल उभी होती. सीएसएमटी स्थानकावर येणाऱ्या लोकलसाठी होम सिग्नल, इनर होम सिग्नल आणि प्लॅटफॉर्म सिग्नल अशा तीन टप्प्यांत परवानगी दिली जाते. या प्रक्रियेत झालेल्या चुकीमुळे संबंधित लोकलने फलाट क्रमांक पाचचा होम सिग्नल ओलांडला; मात्र पुढील इनर होम सिग्नल लाल असल्याचे पाहून मोटरमनने प्रसंगावधान राखत गाडी थांबवली. या वेळी दोन्ही लोकलमध्ये केवळ १३० मीटर अंतर शिल्लक होते. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अखेर संबंधित लोकलला सिग्नल क्रमांक ६१ पासून मागे घेऊन तिला फलाट क्रमांक चारवर आणण्यात आले.
----
चारही प्लॅटफॉर्मची सेवा ठप्प
या प्रकारामुळे सीएसएमटीवरील फलाट क्रमांक पाच, सहा, सात आणि आठवर लोकल वाहतूक सुमारे २५ मिनिटे पूर्णपणे ठप्प झाली. परिणामी, सीएसएमटीकडे येणाऱ्या धीम्या व जलद लोकल एकामागोमाग एक अडकल्या. काही गाड्या सिग्नलवर उभ्या राहिल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला, तर स्थानकांवरही गर्दी वाढली होती. या घटनेचा परिणाम संध्याकाळी ६ वाजेपर्यंत जाणवत होता. अनेक लोकल फेऱ्या पाच ते दहा मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
----
स्थानकप्रमुख निलंबित
मध्य रेल्वे प्रशासनाने या गंभीर प्रकाराची दखल घेत सीएसएमटीच्या स्थानकप्रमुखाला तत्काळ निलंबित करण्यात आले. सिग्नल देण्यात नेमकी चूक कुठे झाली, जबाबदारी कोणाची आणि सुरक्षा प्रक्रियेत त्रुटी कशा राहिल्या, याची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेमागे मानवी चूक कारणीभूत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चौकशी अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.