महामुंबईत पावसाची हजेरी!
गारांचा वर्षाव; व्यावसायिक चिंतेत
बदलापूर, ता. २१ ः ठाण्याजवळील काही शहरांमध्ये तसेच नवी मुंबई, रायगड, अलिबाग या ठिकाणी आज पावसाने हजेरी लावली. काही भागांत मुसळधार पाऊस तर बदलापूर परिसरात गारा पडल्याच्या घटना घडल्या. पहाटेपासून विविध ठिकाणी सुरू असलेल्या पावसाने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली.
शहरी भागात अचानक मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्याने नागरिकांची एकच धांदल उडाली तसेच उकाड्यापासून काहीसा दिलासाही मिळाला. जोरदार वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. नवी मुंबईतील बेलापूर परिसरात आज पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली. काही काळासाठी आलेल्या या पावसानंतर येथील नागरिकांना पुन्हा उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या. रायगड जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला असून, तेथेही पहाटेच ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अलिबागच्या काही भागांत गारांचा पाऊसदेखील झाला. कर्जत तालुक्यात पावसासह वाऱ्यामुळे उच्च दाबाची वीजवाहिनी कोसळली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही काळ येथील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
व्यावसायिक चिंतेत
रायगड परिसरातील मुसळधार पावसामुळे तेथील आंबा आणि काजू बागायतदारांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. पावसामुळे नागरिकांनी बाजाराकडे पाठ फिरवली असल्याने व्यावसायिकदेखील चिंतेत असल्याचे पाहायला मिळत आहेत. विटांचे उत्पादन करणाऱ्या व्यावसायिकांनासुद्धा या पावसाळी वातावरणाचा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. कडक होण्यासाठी उन्हात ठेवलेल्या विटा या अवकाळी पावसात भिजल्याने मोठे नुकसान झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
गारांचा वर्षाव
बदलापूर येथील डोंगराळ मोकळ्या मैदानात काही ठिकाणी गारांचा वर्षाव झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गारांच्या सरींमुळे परिसरातील गवताळ भागावर तसेच शेतातील पिकांचे नुकसान झाले. अलिबाग येथेही पहाटे विजांच्या गडगडाटासह गारांचा पाऊस पडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.