कैलास गायकवाड एसीबीच्या जाळ्यात
लाचप्रकरणी पालिका उपायुक्तास अटक
नवी मुंबई, ता. २१ (वार्ताहर) : अतिक्रमण विभागाला वाहने पुरविणाऱ्या कंत्राटदाराचे बिल मंजूर करण्यासाठी ४२ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महापालिका उपायुक्त कैलास गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई युनिटने मंगळवारी (ता. २१) सायंकाळी रंगेहाथ अटक केली.
महापालिका मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावरील गायकवाड यांच्या दालनातच ही कारवाई करण्यात आल्याने महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील तक्रारदार कंत्राटदार दशरथ सुरवसे हे महापालिका अतिक्रमण विभागाच्या कारवाईसाठी आवश्यक असलेली वाहने पुरवितात. सुरवसे यांनी १५ नोव्हेंबर २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ऐरोली विभागात अतिक्रमणविरोधी मोहिमेसाठी वाहने पुरवली होती. या कामाचा मोबदला (बिल) मिळावा म्हणून ते प्रयत्नशील होते; मात्र हे बिल मंजूर करण्यासाठी आणि धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी उपायुक्त कैलास गायकवाड यांनी ४२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. कंत्राटदार सुरवसे यांनी एसीबीच्या नवी मुंबई कार्यालयात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर नवी मुंबई अँटी करप्शन ब्युरोचे पोलिस उपअधीक्षक धर्मराज सोनके व त्यांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी मुख्यालयात सापळा लावून गायकवाड यांना रंगेहाथ पकडले. सध्या गायकवाड यांची सखोल चौकशी सुरू असून त्यांच्या मालमत्तेचीही तपासणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.