सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : जनगणनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने घरांची मोजदाद आणि परिसर नोंदणी (एचएलबी डिमार्केशन) अवघ्या तीन दिवसांत पूर्ण करत मोठी कामगिरी बजावली आहे. केवळ पाच कर्मचाऱ्यांच्या पथकाने पहाटे ६ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत काम करत पाच हजार २६५ हाऊस लिस्टिंग ब्लॉक्सची मोहीम शंभर टक्के पूर्ण केली. या मोहिमेत सुमारे २७ लाख ठाणेकरांचा डेटा तयार करण्यात आल्याची माहिती मिळते.
ठाणे महापालिकेने आगामी जनगणना प्रक्रियेच्या अनुषंगाने व्यापक तयारी सुरू करण्यात केली आहे. या कामासाठी नऊ प्रभाग समितीअंतर्गत एकूण ७८ क्षेत्रीय प्रशिक्षकांची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यंदाच्या जनगणनेत डिजिटल प्रणालीचा वापर करून एचएलओ ॲपद्वारे घरगणना करण्यात आली. पहिल्यांदाच अशा स्वरूपामध्ये जनगणना होत असल्यामुळे ठाणे महापालिकेसाठीसुद्धा हे एक आव्हान होते. प्रशिक्षण कालावधीमुळे सुरुवातीला ही मोहीम धीम्या गतीने चालली. त्यामुळे राज्यात ठाणे महापालिका ६०व्या क्रमांकावर होती.
उपायुक्त मधुकर बोडके यांच्या नेतृत्वात पाच कर्मचाऱ्यांच्या पथकाने शहरातील तब्बल पाच हजार २६५ हाऊस लिस्टिंग ब्लॉक्स पूर्ण केले आहेत. साधारणपणे एका एचएलबीमध्ये ८०० घरांचा समावेश असतो. ठाण्यातील २७ लाख नागरिकांचा प्राथमिक डेटा या प्रक्रियेत समाविष्ट झाला आहे. ही प्रक्रिया म्हणजे प्रत्येक घर, इमारत, परिसर यांची नोंद करून भविष्यातील जनगणना, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सेवा यांसारख्या नागरी सुविधांचे नियोजन करण्याचा पाया आहे, त्यामुळे या मोहिमेचे महत्त्व अधिक आहे.
राज्यात तिसरा क्रमांक
या झपाट्याने केलेल्या कामामुळे ठाणे महापालिकेने राज्यातील क्रमवारीत ६०व्या स्थानावरून थेट ३०व्या स्थानावर झेप घेतली आहे. शनिवार ते सोमवार या कालावधीमध्ये दिवस-रात्र पालिका अधिकारी, कर्मचारी एकाच ठिकाणी ठाण मांडून बसल्याने ही कामगिरी झाल्याची माहिती उपायुक्त मधुकर बोडके यांनी दिली.
सर्वाधिक गर्दीचा दिवा
प्रभागनिहाय एचएलबी नोंदणीमध्ये सर्वाधिक घरांची गर्दी दिवा प्रभाग समितीमध्ये आढळून आली आहेत, तर नवीन ठाणे म्हणून ओळखले जाणारे माजिवडा-मानपाडा दुसऱ्या स्थानकावर आहे.
आकडेवारीतून चित्र स्पष्ट
एकूण एचएलबी : ५ हजार २६५
पूर्ण झालेले जिओ-टॅगिंग : १०० टक्के
पूर्ण डिमार्केशन : १०० टक्के
प्रलंबित काम : शून्य
प्रभागनिहाय एचएलबी नोंदणी
माजिवडा-मानपाडा ९०३
वर्तकनगर ५१२
लोकमान्य-सावरकरनगर ५४२
वागळे २३०
उथळसर ४०२
नौपाडा-कोपरी ३२५
कळवा ६२२
मुंब्रा ५१६
दिवा १,२१३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.