रिक्षाचालकाच्या लेकीची जिद्दीला सलाम!
अश्विनी हुंडारेची मुंबई लोहमार्ग पोलिस दलात दमदार निवड
जुईनगर, ता. २० (बातमीदार) : अखंड मेहनत, जिद्द, चिकाटी आणि कुटुंबाच्या पाठबळाच्या जोरावर रिक्षाचालकाच्या लेकीने मोठे यश संपादन केले आहे. अश्विनी गुलाब हुंडारे हिची मुंबई लोहमार्ग पोलिस दलात निवड झाली असून, तिच्या यशामुळे कुटुंबासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सामान्य कुटुंबातील अश्विनीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून हा यशाचा टप्पा गाठला. तिचे वडील रिक्षाचालक असून आई गृहिणी आहे. घरातील दोन बहिणी अजून शिक्षण घेत आहेत. आर्थिक परिस्थिती मर्यादित असतानाही कुटुंबाने अश्विनीच्या स्वप्नांना कधीही मर्यादा येऊ दिल्या नाहीत. अश्विनीने दहावीपर्यंतचे शिक्षण पुणे विद्यार्थी गृहाच्या विद्या भवन येथे पूर्ण केले. शिक्षणाबरोबरच तिला लहानपणापासूनच क्रीडाक्षेत्राची आवड होती. विशेषतः कराटे या खेळात तिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. डीएसओ स्पर्धेत राज्यस्तरीय कांस्यपदक पटकावत तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सन २०२१ पासून अश्विनीने पोलिस भरतीसाठी तयारी सुरू केली. मात्र, पहिल्या दोन भरती प्रक्रियेत तिला थोड्याशा गुणांनी अपयश आले. अनेकदा यश अगदी जवळ येऊनही हुलकावणी देत होते. परंतु, तिने हार न मानता प्रयत्न सुरूच ठेवले. प्रत्येक अपयशातून शिकत ती अधिक ताकदीने उभी राहिली. तिसऱ्या प्रयत्नात तिने कोपरखैरणे येथील शिवस्वराज्य डिफेन्स अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. अकॅडमीचे मार्गदर्शक महेंद्र जुनघरे यांच्या मार्गदर्शनामुळे आणि स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर अखेर अश्विनीचे स्वप्न साकार झाले.