सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : शहरातील मॉन्सूनपूर्व नालेसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू असून ज्या ठिकाणी शक्य तेथे रोबोटिक यंत्रांच्या साह्याने सफाई केली जात आहे, अशी माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली. अरुंद नाल्यांमध्ये मनुष्यबळाच्या साह्याने कामे केली जात असून कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती काळजी घेतली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नालेसफाईदरम्यान कामगारांना गमबूट, हॅण्डग्लोज, मास्क आदी सुरक्षासाहित्य दिले असून संबंधित कंत्राटदारांना प्रथमोपचार साहित्य उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
कामगारांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे आयुक्तांनी नमूद केले.
महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि आयुक्त राव यांनी शहरातील विविध भागांना भेट देत नालेसफाईच्या कामांचा आढावा घेतला. घोडबंदर रोड येथील बटाटा कंपनी परिसर, कापूरबावडी, कॅसल मिल तसेच वर्तकनगर येथील थिराणी शाळेजवळील नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात उपमहापौर कृष्णा पाटील, स्थानिक नगरसेविका विमल भोईर, नंदा पाटील, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगरअभियंता राणी शिंदे, उपायुक्त मधुकर बोडके यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. मुंब्रा परिसरातून नालेसफाईला सुरुवात झाली आहे. यंदा मे अखेरपर्यंत सर्व नालेसफाईची कामे पूर्ण होतील, असा विश्वास महापौर पिंपळोलकर यांनी व्यक्त केला. शहरातील सुमारे १८६ किलोमीटर लांबीच्या नाल्यांची सफाई करण्याचे नियोजन आहे.
यंदा विविध प्रभागांतील नालेसफाईसाठी सात ठेकेदारांची नियुक्ती करून कामाचा वेग वाढविण्यात आला आहे. नाल्यातील गाळ शास्त्रोक्त पद्धतीने हाताळून योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्यावर विशेष भर दिला जात असल्याचे आयुक्तांनी सांगितले. शहरातील नालेसफाईच्या कामांचा दैनंदिन आढावा घेतला जात असून, ज्या कंत्राटदारांकडे मनुष्यबळ किंवा यंत्रसामग्रीची कमतरता भासेल त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
दोन पूल जीर्ण
पाहणीदरम्यान काही ठिकाणी जुने कल्व्हर्ट आणि कॅसल मिल येथील नाल्यावरील पूल जीर्ण झाल्याचे निदर्शनास आले. या पुलाचे व्हीजेटीआयमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या असल्याचे आयुक्त राव यांनी सांगितले.
घोडबंदर मार्गाची संयुक्त पाहणी
मॉन्सूनपूर्व कामाचे नियोजन करताना महापालिका, एमएमआरडीए, मेट्रो, एमएसआरडीसी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात समन्वय ठेवण्यावरही भर देण्यात येत आहे. घोडबंदर रोड हा विविध प्राधिकरणाच्या अखत्यारित येत असल्याने या मार्गावरील कामे पावसाळ्यापूर्वी करण्यासंदर्भात सर्व प्राधिकरणासोबत संयुक्त पाहणी महापौरांसमवेत करण्यात येणार असल्याचेही आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी नमूद केले.
३१ मेपूर्वी कामे पूर्ण करण्याचे निर्देश
नाल्यातील काढलेला गाळ हा तिथेच न ठेवता तो सुकल्यानंतर योग्य ठिकाणी स्थलांतरण करणे, आवश्यक त्या ठिकाणी नाल्यांच्या संरक्षक भिंतींची दुरुस्ती करणे; तसेच रोबोटिक यंत्राचा वापर करून शहरातील नालेसफाईची कामे ३१ मेपूर्वी पूर्ण होतील या दृष्टीने नियोजन करण्याचे आदेश महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी प्रशासनाला दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.