पनवेलचा मोठा अर्थसंकल्प, लहान निधी!
नगरसेवकांची कोंडी कायम
निधीवाढीची मागणी; पाच लाखांत विकास कसा?
पनवेल, ता. २२ (बातमीदार) ः पनवेल महापालिकेचा तब्बल चार हजार ८५३ कोटींचा अर्थसंकल्प प्रशासनाकडून सत्ताधाऱ्यांकडे सादर केला असला, तरी नगरसेवकांना मिळणाऱ्या निधीचा दुष्काळच पाहायला मिळत आहे. शहराचा झपाट्याने वाढणारा विस्तार, वाढती लोकसंख्या आणि स्थानिक पातळीवरील मूलभूत सुविधांची गरज लक्षात घेता केवळ पाच लाखांच्या वार्षिक निधीमुळे विकास करायचा कसा, असा सवाल नगरसेवकांकडून विचारला जात आहे. त्यामुळे निधी वाढवण्याची मागणी नगरसेवकांमधून होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि सत्ताधारी यांच्यात नेमका काय धोरणात्मक निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पनवेल पालिकेचा विस्तार ११० चौरस किलोमीटरवर असून लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. पनवेल मनपाला ‘ड’ वर्ग महापालिका म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. या वर्गीकरणामुळे निधी वितरण, अनुदाने आणि आर्थिक मर्यादा यांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याचे सांगितले जाते. २०१७ पासून नगरसेवकांना वर्षाला केवळ पाच लाख रुपये निधी दिला जात आहे. या तुटपुंजा रकमेत कचराकुंडी, बाकडे किंवा लहान निवारा शेड या पलीकडे ठोस कामे करणे अशक्य असल्याचे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे.
पनवेल पालिकेचा चार हजार ८५३ कोटींचा अर्थसंकल्प लवकरच स्थायी समिती सभापती बबन मुकादम यांच्याकडून सर्वसाधारण सभेत मांडला जाणार आहे; परंतु पनवेल पालिकेसमोर मालमत्ता कराचे मोठे आव्हान आहे. थकीत कराची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढली असून, हा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. आयुक्त मंगेश चितळे यांनी कर सवलत योजना जाहीर केली होती; मात्र २०१६ पासूनचा कर भरल्याशिवाय सवलत मिळत नसल्याने अनेक नागरिकांनी या योजनेकडे पाठ फिरवली. परिणामी, महसूल वाढीवर मर्यादा येत असल्याचे दिसून येते.
निधी वाढीचा प्रस्ताव; पण समाधानाचा प्रश्न कायम
सध्याच्या प्रस्तावानुसार नगरसेवकांचा निधी पाच लाखांवरून सात लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार प्रशासन करत आहे; मात्र ही वाढ अत्यल्प असल्याचे नगरसेवकांचे मत आहे. खासगीत अनेक नगरसेवकांनी सात लाखांत काय होणार, असा सवाल उपस्थित केला आहे. काही लोकप्रतिनिधींनी थेट ५० लाखांपर्यंत निधी वाढवण्याची मागणी केली आहे. सध्या १५ ते २५ लाखांपर्यंत निधी वाढवण्याचा मध्यममार्ग स्वीकारला जाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नगरसेवक निधी वाढवण्यासंदर्भाचा प्रस्ताव आहे. आगामी सभेमध्ये याबाबत नक्कीच सकारात्मक निर्णय घेतला जाईल; मात्र हा निधी किती असेल हे आताच सांगता येणार नाही. नगरसेवकांना आपल्या प्रभागात काम करण्यासाठी समाधानकारक निधी मिळावा, ही सत्ताधाऱ्यांची धारणा आहे. त्यानुसार नक्कीच पावले उचलण्यात येतील.
- नितीन पाटील, महापौर, पनवेल महापालिका
नगरसेवक निधी हा स्थानिक पातळीवर नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व आपल्या प्रभागातील विकासकामांसाठी वापरला जातो. हा निधी वैयक्तिक फायद्यासाठी वापरता येत नाही. तसेच, सर्व कामे महापालिका प्रशासनाच्या मंजुरीने केली जातात. त्यामुळे एमएमआर विभागात तीन नंबरची सर्वात मोठी असलेल्या पालिकेने नगरसेवक निधीची रक्कम वाढवून ती वार्षिक २५ लाख रुपये करावी.
- रामदास शेवाळे, नगरसेवक, प्रभाग क्रमांक आठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.