इलेक्ट्रिक वस्तूंच्या किमतीत १०-१२ टक्क्यांनी वाढ
बेलापूर, ता. २४ (बातमीदार) : जागतिक स्तरावर युद्धामुळे देशात जनजीवन विस्कळित झाले आहे. असे असतानाच अलीकडेच भारतात एसी, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि स्मार्टफोनसह अनेक इलेक्ट्रिक वस्तूंमध्ये १० ते १२ टक्क्यांनी दरवाढ झाली आहे. परिणामी नागरिकांना ऐन उन्हाळ्यात एसी, फ्रीज, कूलरसारख्या वस्तू खरेदी करताना खिशाला कात्री लागत आहे.
जीएसटी कमी झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, आता आखाती देशातील युद्धाचा परिणाम कच्च्या मालाच्या आयातीवर झाला आहे. यामुळेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीत तब्बल १० ते १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. एकीकडे पेट्रोल डिझेलच्या आणि एलपीजी गॅसच्या किमतीत वाढ झाली असताना आता दैनंदिन वापरातील इलेक्ट्रिक वस्तूंच्या किमतीत झालेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
--------------
दरवाढीचे नेमकी कारणे काय?
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमकुवत झाल्यामुळे आयात खर्च वाढला आहे. वाहतुकीचा खर्च वाढल्यानेही उत्पादनांच्या किमतीत वाढ झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये वापरला जाणारा प्लॅस्टिक आणि रसायनांसारखा अनेक कच्चा माल कच्च्या तेलापासून मिळवला जातो. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे कंपन्यांच्या उत्पादन खर्चावर थेट परिणाम झाला आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात वापरले जाणारे प्लॅस्टिक आणि रसायने (जे कच्च्या तेलापासून बनतात) महाग झाल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. यासोबत मेमरी चिप्स आणि इतर आवश्यक सेमीकंडक्टर घटकांचा जागतिक तुटवडा असल्याने किमती वाढल्या आहेत.
----------------
इलेक्ट्रिक वस्तूंच्या वाढीबाबत :
स्मार्टफोन - १० ते १५ टक्के
लॅपटॉप - ८ ते १० टक्के
एसी, टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन - ५ ते ७ टक्के
-------
अशा आहेत दरवाढीनंतरच्या किमती
एसी ३-स्टार १.५-टन एसीची किंमत आता ३७,००० - ४०,००० रुपयांपर्यंत पोहोचली आहे, जी पूर्वी ३२,००० - ३४,००० होती. स्मार्टफोनमध्ये प्रमुख ब्रँड्स जसे की विवो, ओपो, सॅमसंग, शिओमी यांनी किमती वाढवल्या असून, काही नवीन मॉडेल्स ३६ टक्क्यांपर्यंत महाग झाले आहेत.