तीन बांगलादेशी घुसखोरांना दीड वर्षाचा कारावास
बेलापूर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
नवी मुंबई, ता. २२ (वार्ताहर) : भारतीय सीमेत अनधिकृतपणे प्रवेश करून नवी मुंबईत वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना बेलापूर सत्र न्यायालयाने मंगळवारी (ता. २२) दोषी ठरवले आहे. या तिघांना प्रत्येकी एक वर्ष चार महिने साधा कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मकरंद मांडवगडे यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
आयशा इर्शाद शेख (४०), रुबीना इर्शाद शेख (१९) हुसेन ऊर्फ सागर सज्जाद शेख (२५) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत. वाशी पोलिसांनी १५ जानेवारी २०२५ला जुहूगाव परिसरात धाड टाकून बेकायदा वास्तव्यास असलेल्या या तिघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे भारतात राहण्यासाठी कोणताही वैध परवाना, पासपोर्ट किंवा व्हिसा नसल्याचे तपासात आढळून आले होते. त्यांच्या चौकशीत त्यांनी बांगलादेशचे नागरिक असल्याचे कबूल केल्याल्यानंतर वाशी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. या तिघांवर बेलापूर येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी वकील शशिकांत इघारे यांनी युक्तिवाद करताना अनधिकृत घुसखोरी ही देशाअंतर्गत सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने पुराव्याअंती तिन्ही आरोपींना दोषी धरीत शिक्षा ठोठावली. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर या तिन्ही आरोपींना बांगलादेश दूतावासाच्या माध्यमातून पुन्हा त्यांच्या देशात पाठवण्याचे आदेश न्यायालयाने नवी मुंबई पोलिस आयुक्तांना दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणातील रेश्मा शेख ही फरार असून, तिच्याविरोधात स्वतंत्र खटला चालवण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.