देवदूत ठरणारी ‘१०८’ यंत्रणा फेल?
कल्याणमध्ये रुग्णवाहिकेअभावी पादचाऱ्याचा मृत्यू
कल्याण, ता. २३ (बातमीदार) : आपत्कालीन परिस्थितीत जीवनदायिनी समजली जाणारी ‘१०८’ रुग्णवाहिका सेवा कल्याणात कुचकामी ठरली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या हद्दीत रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने मेवालाल गुप्ता (६५) या पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. २२) समोर आली आहे.
कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील दीपक हॉटेलजवळ गुप्ता यांना छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी स्वतः आणि उपस्थित स्थानिक रहिवाशांनी तातडीने ‘१०८’ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला आणि रुग्णवाहिकेची मागणी केली; मात्र वारंवार फोन करूनही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यास तब्बल ४० मिनिटांचा विलंब झाला. ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथून रुक्मिणीबाई रुग्णालय अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असतानाही रुग्णवाहिका वेळेत पोहोचू शकली नाही.
----------------------
आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा रुग्णवाहिका आली तेव्हा त्यात डॉक्टर उपलब्ध नव्हता. तोपर्यंत गुप्ता यांचा मृत्यू झाला होता. वेळेत मदत मिळाली असती तर त्यांचा जीव वाचू शकला असता, अशा भावना व्यक्त करत संतप्त नागरिकांनी प्रशासनाचा तीव्र निषेध केला. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून, आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
-------------------------------
हल्ल्याच्या भीतीने पलायन
रुग्णवाहिकेवरील डॉ. मोहम्मद तोफिक आणि चालक प्रकाश चोरगे यांनी निष्काळजीचा आरोप फेटाळून लावला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, रात्री १०.२९ वाजता फोन आल्यानंतर १२ मिनिटांत घटनास्थळी पोहोचल्याचे सांगण्यात आले; मात्र तोपर्यंत संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तेथे जमलेल्या संतप्त गर्दीकडून हल्ला करण्याच्या भीतीने आम्हाला तेथून निघावे लागले असल्याचे त्यांनी म्हटले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.