उल्हासनगर, ता. २३ (बातमीदार) : उल्हासनगर महापालिकेत एकमेव काँग्रेसच्या नगरसेविका अंजली साळवे यांना महापौर अश्विनी कमलेश निकम यांनी अचानक विरोधी पक्षनेतेपदी घोषित केले. या निवडीवरून महासभेत शिवसेना आणि भाजपमध्ये तीव्र वाद निर्माण झाला. ७८ सदस्यीय सभागृहात या निर्णयानंतर भाजपच्या नगरसेवकांनी जोरदार विरोध दर्शवला आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला. विरोध सुरू असतानाच महापौरांनी राष्ट्रगीत सुरू करून सभा तहकूब केली.
भाजपने या निर्णयाला ‘युती धर्माचा भंग’ असे संबोधत शिवसेनेवर पूर्व चर्चा न करता निर्णय घेतल्याचा आरोप केला. कायद्यानुसार फक्त एक नगरसेवक असलेल्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपदासाठी पात्रता नसते. त्यामुळे हे पद भाजपला मिळायला हवे होते, असा दावा भाजपचे गटनेते राजेश वधारिया यांनी केला. विरोधी पक्षनेता निवडीचा विषय कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक सभागृहात मांडण्यात आला, ज्यामुळे भाजपला आपली भूमिका मांडण्याची संधी मिळाली नाही. हा मुद्दा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मांडला जाईल आणि महापालिकेत शिवसेनेसोबतची युती कायम ठेवायची की नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच महापौरांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याबाबतही विचार सुरू आहे, असे वधारिया यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या नगरसेवकांनी महापालिका सचिवांवरही नियमांनुसार कामकाज न केल्याचा दावा करत त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही नगरसेवकांनी आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या कार्यालयाबाहेरही आंदोलन केले. महापौरांनी शेवटच्या क्षणी विषय आणून आणि राष्ट्रगीत सुरू करून प्रस्ताव मंजूर करण्याचा प्रयत्न केला, जे लोकशाही प्रक्रियेला धरून नाही, असे भाजपच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला.
शिवसेना-भाजप सत्तेत!
शिवसेनेचे गटनेते अरुण आशान यांच्याशी विचारणा केली असता, त्यांनी महापौरांच्या निर्णयाचे समर्थन केले. विरोधी पक्षनेता निवडण्याचा अधिकार हा महापौरांचा विशेषाधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना-भाजप सत्तेत असून, काँग्रेस हा एकमेव विरोधी पक्ष असल्याने या पदावर नगरसेविका अंजली साळवे यांची निवड करण्यात आली, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, भाजपची भूमिका दुटप्पी असल्याचे आशान यांनी सांगितले.
महापौरांच्या भूमिकेमुळे संताप
विरोधी पक्षनेत्याच्या नेमणुकीच्या विरोधात महासभेत झालेल्या गोंधळप्रकरणी आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी सर्व पक्षीय गटनेत्यांना दालनात बैठकीसाठी बोलावले. या बैठकीला शिवसेना गटनेते अरुण आशान यांच्याबरोबर महापौरांचे पती कमलेश निकम हेसुद्धा आयुक्त भेटीला गेले.
आयुक्तांच्या दालनात शिरण्याचा प्रयत्न
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, नगरसेवक संजय सिंग, टोनी सिरवाणी, भाजप कार्यकर्ते अवि पंजाबी, आकाश चंदनानी आदींनी संताप व्यक्त करत धक्काबुक्की करीत आयुक्त दालनात शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना सुरक्षा रक्षकांनी अटकाव केल्याने एकच गोंधळ उडाला.
पोलिसांमुळे वादावर पडदा
सुरक्षा रक्षक आणि भाजप पदाधिकारी यांच्यात वादाच्या फेरी उडाल्या. अखेर मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर आवताडे आणि त्यांच्या पथकाने पालिका मुख्यालयाचा ताबा घेतल्यानंतर वाद निवळला.
महासभा चालवण्याचा सर्वस्वी अधिकार हा महापौरांचा असतो. त्याप्रमाणे त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून अंजली साळवे यांच्या नावाची घोषणा केली. त्यात प्रशासनाचा काही संबंध नाही.
- मनीषा आव्हाळे, आयुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.