डहाणूचे ताडगोळे पर्यटकांचे आकर्षण
उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठीचा उत्तम पर्याय
वाणगाव, ता. २४ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यात उष्णतेमुळे अंगाची काहिली होत असल्याने लिंबू पाणी, उसाचा रस, सरबत अशा शीतपेयांच्या मागणीत वाढ झाली आहे. दुसरीकडे डहाणूतील रसरशीत ताडगोळे बाजारात दाखल झाले असून पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहेत.
पालघर जिल्हा हा पर्यटनाचे आकर्षण असल्याने सुट्टीच्या दिवशी मोठ्या संख्येने मुंबईकर येत असतात. येथील पर्यटनस्थळांबरोबर विविध खाद्यपदार्थांचेदेखील त्यांना आकर्षण आहे. डहाणूतील ताडगोळे चवीला गोड आणि मऊ असल्याने पर्यटकांची नेहमी पसंती असते. यातून स्थानिकांना रोजगाराची संधीही मिळाली आहे. उन्हाळ्याच्या हंगामात येणारी ही फळे चवीला गोड असल्याने समुद्र किनारपट्टी भागामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यामुळे उन्हाळ्यात नैसर्गिक तहान भागवणाऱ्या ताडगोळ्यांकडे ग्राहकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.
-----------------------------
डझनाला १२० रुपयांचा भाव
ताडगोळे झाडावरून काढण्यासाठी मजुरीत वाढ झाल्याने ताडगोळ्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. मध्यम उंचीच्या एका झाडापासून ताडगोळे उतरवण्यासाठी १०० रुपये, तर उंच झाडांसाठी १५० रुपये द्यावे लागतात. त्यामुळे दिवसाला एक हजार रुपये खर्च असल्याने डहाणू तालुक्यात सरासरी १२० रुपये प्रति डझन, तर ताडगोळ्याची एक पेंड सरासरी २५० ते ३०० रुपयांना विकली जात आहे.
------------------------
आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक
पाण्याने भरलेले हे फळ चवीलाही गोड असते. ताडगोळ्यांमुळे शरीरातील उष्णता नियंत्रित राहण्यास मदत होते. मोठ्या प्रमाणात पोषक तत्त्व असून सेवनामुळे प्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. तसेच खनिज, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन अ, ब, क जीवनसत्वे आढळत असल्याने फळ शरीरासाठी खूप उपयुक्त ठरते.
------------------
कुडाची घरे शिवण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी ताडाच्या झाडाच्या झावळ्यांचा वापर केल्यास हिवाळ्यात थंडीपासून, उन्हाळ्यात उष्णतेपासून, पावसाळ्यात गळतीपासून संरक्षण होते. ताडाच्या झाडाचा प्रत्येक भाग उपयोगी असल्याने शेतकऱ्यांनी झाडांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
- अनिल पाटील, ताडगोळे उत्पादक, कोलवली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.