मुरुड-जंजिऱ्याचा कायापालट होणार
जेट्टी ते होमस्टेपर्यंत कोळी बांधवांना मिळणार आधुनिक सुविधा ः नितेश राणे यांचे निर्देश
मुरुड, ता. २४ (बातमीदार) ः मुरुड-जंजिरा परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि स्थानिक कोळी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. मुरुडच्या जेट्टीपासून ते पर्यटकांच्या निवासासाठीच्या होमस्टेपर्यंत सर्वत्र आधुनिक सुविधा पुरवण्याचा व्यापक आराखडा तयार करण्यात आला असून, यामुळे स्थानिकांच्या रोजगाराला नवी दिशा मिळणार आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालयात झालेल्या विशेष बैठकीत मुरुड-जंजिरा नगरपरिषद हद्दीतील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
मुरुड-जंजिरा हा पर्यटन आणि मच्छीमारांचा परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसराचा सर्वांगीण विकास करताना पारंपरिक मासेमारी व्यवसाय करणाऱ्या कोळी समाजाच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना आवश्यक असलेल्या आधुनिक सुविधा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये जेट्टी उभारणी, बर्फगृहे (कोल्ड स्टोरेज), मासळी साठवण केंद्रे, तसेच बोट दुरुस्ती सुविधा यांचा समावेश आहे. या उपाययोजनांमुळे मच्छीमारांचे दैनंदिन काम सुलभ होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पर्यटन आणि मत्स्य विभाग यांच्या समन्वयातून या योजना प्रभावीपणे राबवण्यात येणार असून, विकास प्रक्रियेत स्थानिकांचा सक्रिय सहभाग वाढवण्यावरही विशेष भर देण्यात आला आहे. त्यामुळे मुरुड-जंजिरा केवळ पर्यटनाचे केंद्र न राहता, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर भाग म्हणून विकसित होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या बैठकीला मत्स्य आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, पर्यटन सचिव संजय खांदारे, मुरुडच्या नगराध्यक्षा आराधना दांडेकर, मुख्याधिकारी सचिन बच्छाव तसेच जय भवानी मच्छिमार संस्थेचे चेअरमन प्रकाश सर पाटील व मच्छीमार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
रोजगाराच्या संधी
मुरुड-जंजिरा परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने अधिक विकास करण्यावरही भर देण्यात आला आहे. कोळी संस्कृती जपत बॅकवॉटर प्रकल्प, होमस्टे, स्थानिक खाद्यपदार्थ, बोटिंग यांसारख्या उपक्रमांना चालना दिली जाणार आहे. यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्याबरोबरच स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.