पेण येथे प्राथमिक आरोग्य केंद्रांची आढावा बैठक
सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याचे प्रश्न मार्गी लावणार : सभापती
पेण, ता. २४ (वार्ताहर) : पेण विधानसभा मतदार संघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामकाजाची आढावा बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांना दर्जेदार व तत्पर आरोग्य सेवा मिळावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे आरोग्याचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे काम तातडीने करणार असल्याचे सभापती वैकुंठ पाटील यांनी बैठकीत सांगितले.
तसेच पेण तालुक्यातील कळवा आणि गडब येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी प्रत्येकी सुमारे अडीच कोटीचा निधी नॅशनल हेल्थ मिशन आणि जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर करून लवकरच या आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकामाला सुरुवात होणार असल्याचीही माहिती कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुळकर, रोहा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रियांका साळुंखे, पेण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील नखाते, सुधागड तालुका आरोग्य अधिकारी डॉ शशिकांत मढवी, जेएसडब्ल्यू सीएसआर विभाग अधिकारी सुधीर तेलंग, रसिक काळे तसेच जिल्हा परिषद सदस्य जागृती मानकर, प्रभाकर म्हात्रे, जनार्दन भस्मा, पंचायत समिती सदस्य विवेक म्हात्रे आदिंसह आरोग्य विभाग अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.