मुरूड येथे ऑनलाइन आंतरराष्ट्रीय परिषद
इमर्जिंग ट्रेंड्स इन बिसनेस अँड मॅनेजमेंट या विषयावर चर्चा
मुरूड, ता. २४ (बातमीदार)ः अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स यांच्या पुढाकाराने, तसेच रयत शिक्षण संस्थेचे वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, फुंडे, उरण, नवी मुंबई, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला व वाणिज्य महाविद्यालय, खारेपाटण, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग व अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ कॉमर्स, श्रीवर्धन, जि. रायगड या महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने “इमर्जिंग ट्रेंड्स इन बिसनेस अँड मॅनेजमेंट या विषयावर गुरूवारी (ता.२३) आंतरराष्ट्रीय परिषद ऑनलाइन माध्यमातून घेण्यात आली.
या महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमात रायगड, नवी मुंबई, सिंधुदुर्ग तसेच देश-विदेशातील विविध शैक्षणिक संस्थांमधील १६५ हून अधिक प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या संमेलनात व्यवसाय आणि व्यवस्थापन क्षेत्रातील नव्या प्रवाहांवर सखोल चर्चा करण्यात आली.
या आंतरराष्ट्रीय ई-संमेलनामुळे व्यवसाय आणि व्यवस्थापन क्षेत्रातील नव्या प्रवाहांची माहिती मिळाली तसेच संशोधक आणि प्राध्यापकांना एक व्यासपीठ उपलब्ध झाले. विविध देशांतील तज्ज्ञांच्या सहभागामुळे संमेलनाला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आणि ज्ञानवृद्धीस मोठा हातभार लागला असे मत अंजुमन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साजिद शेख यांनी व्यक्त केले.