कोकण कन्या एक्स्प्रेसला माणगाव थांबा देण्याची मागणी
माणगाव, ता. २४ (वार्ताहर)ः कोकण कन्या एक्स्प्रेस सुरू झाली आहे. मात्र रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगाव येथील रेल्वे स्थानकावर थांबा नसल्याने दक्षिण रायगड मधील सात तालुक्यातील हजारो रेल्वे प्रवाशांना लाभ मिळत नाही. त्यामुळे माणगाव येथील रेल्वे स्थानकावर कोकण कन्या एक्स्प्रेसला थांबा देण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ११:०२ वाजता सुटणारी ही गाडी सकाळी ०९:४५ वाजता मडगावला पोहोचते. या प्रवासात माणगाव येथे ही गाडी थांबवण्यात यावी, याची जोरदार मागणी स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रवासी संघटनांकडून केली जात आहे.
माणगाव हे कोकणातील एक प्रमुख शैक्षणिक, व्यापारी आणि सामाजिक केंद्र असूनही कोकणकन्या एक्सप्रेसला येथे थांबा न घेणे, ही एक प्रकारची उपेक्षा असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. माणगाव येथे दररोज शिक्षण, नोकरी, व्यवसाय किंवा उपचारासाठी अनेक प्रवासी येत असतात. माणगावला गाडी थांबत नसल्यामुळे प्रवाशांना जवळच्या स्थानकांवर उतरून अतिरिक्त प्रवास करावा लागतो, ज्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा ताण वाढतो. थांबा देण्याच्या या मागणीकडे रेल्वे प्रशासनाने संवेदनशीलतेने पाहून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी सर्वांची अपेक्षा आहे.