कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांतूनच यशाची वाट
डॉ. किरणकुमार बोंदर यांचे प्रतिपादन
विरार ता. २४ (बातमीदार) : ‘कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करा,’ असा प्रेरणादायी संदेश कोकण विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांनी विद्यार्थ्यांना दिला. विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात आयोजित पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
आजच्या तरुणाईने डिजिटल व्यसनाधीनतेपासून सावध राहावे, निर्व्यसनी जीवनशैली स्वीकारावी, तसेच पालकांविषयी कृतज्ञता आणि सामाजिक भान जपावे, असे मार्गदर्शन करत त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आणि पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष हसमुखभाई शाह होते. त्यांनी विद्यार्थ्यांना बदलत्या काळातील आव्हानांना सामोरे जाताना नवकल्पनांचा स्वीकार करण्याचा व विविध व्यवसायसंधींचा गांभीर्याने विचार करण्याचा सल्ला दिला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक प्रश्नांची जाणीव, ज्ञाननिष्ठेचे महत्त्व अधोरेखित करत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बदलत्या सामाजिक प्रवाहांमधील आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा मंत्र दिला. सी. आर. राजाणी सभागृहात झालेल्या या समारंभात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील पदवीधर विद्यार्थ्यांपैकी ४७ विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच विविध रोख पारितोषिकेही प्रदान करण्यात आली.
समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीराम डोंगरे, डॉ. अम्रिता जाधव आणि प्रा. शैलेश औटी यांनी केले, तर उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार शेळके यांनी आभारप्रदर्शन केले. या वेळी संस्थेचे पदाधिकारी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.