आरटीई प्रवेश निश्चितीसाठी मुदतवाढ मिळाल्याने पालकांना दिलासा
अलिबाग, ता. २४ (वार्ताहर) ः आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. प्रवेश निश्चितीसाठी आवश्यक असणारी कागदपत्र पडताळणी आणि शाळेतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने यासंदर्भातील माहिती दिली असून, पालकांनी या वाढीव मुदतीचा लाभ घेत आपल्या पाल्यांचा प्रवेश तातडीने निश्चित करावा, असे आवाहन केले आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९मधील कलमानुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयंअर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा या शाळांमध्ये आरटीई २५ टक्के जागा आरक्षित ठेवल्या आहेत. ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येते. आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी नावनोंदणी झाल्यानंतर सोडत प्रक्रिया राबविण्यात आली होती. या सोडतीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या कागदपत्रांची पडताळणी करण्याठी व आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी २० एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. मात्र आता ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या पालकांनी आपल्या पाल्याचे कागदपत्रे पडताळणी करून आपल्या पसंतीच्या शाळेमध्ये पाल्याचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहीतुले यांनी केले आहे.