भावाच्या चाकू हल्ल्यात आठवर्षीय बहिणीचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : मुंब्रा परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या १६ वर्षीय भावाने आठ वर्षांच्या बहिणीवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने त्या परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ एप्रिलला पहाटे सुमारे २:३० वाजता मुंब्र्यातील एका इमारतीत ही घटना घडली. घरात सर्वजण झोपेत असताना आठवर्षीय मुलीच्या गळ्यावर तिच्याच १६ वर्षीय मोठ्या भावाने चाकूने वार केला. या मुलीच्या वडिलांनी आवाज ऐकून जागे होताच मुलाच्या हातात चाकू पाहिला आणि आरडाओरड होताच तो घराबाहेर पळून गेला. गंभीररीत्या जखमी झालेल्या मुलीला प्रथम खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना तिचा १९ एप्रिलला मृत्यू झाला. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार, गळ्यावर झालेल्या गंभीर जखमेमुळे मेंदूवर परिणाम होऊन तिचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, मुलाच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात त्यांचा मुलगा मागील दोन वर्षांपासून स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराने ग्रस्त आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेच्या दिवशी तो मोबाईलवर व्हिडिओ पाहात होता आणि त्यातील कृतीची नक्कल करण्याच्या प्रयत्नात ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी वडिलांनी कोणतीही कायदेशीर तक्रार देण्यास नकार दिला असला तरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.