अडीच वर्षांनंतर हत्येचा उलगडा
नांदेडमध्ये वेशांतर करून मुख्य आरोपीला अटक
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २५ ः डोंबिवलीतील खळबळजनक हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात विष्णूनगर पोलिसांना तब्बल अडीच वर्षांनंतर यश आले आहे. एका पार्टीदरम्यान झालेल्या किरकोळ वादातून रिक्षाचालक मित्राची हत्या करून फरार झालेला मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी नांदेडमध्ये पाच दिवस शेतमजुराचा वेश धारण करून थेट सापळा रचला.
डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा खाडी परिसरात २७ नोव्हेंबर २०२३ला सोमनाथ शिंदे या रिक्षाचालकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी यापूर्वी विलन ठावरे (४१) आणि योगेश डोंगरे (४२) यांना अटक केली होती; मात्र या हत्येचा मुख्य सूत्रधार मानला जाणारा दीपक करकडे (४०) हा घटनेनंतर पसार झाला होता.
-------------
अडीच वर्षांपासून पोलिसांंना चकवा
गेल्या अडीच वर्षांपासून करकडे पोलिसांना चकवा देत होता. ओळख लपवण्यासाठी त्याने कोणतेही ओळखपत्र जवळ ठेवले नव्हते, तसेच मोबाईलचाही वापर टाळला होता. तो नांदेडमध्ये शेतमजूर म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तपासाला वेग आला.
-----------------
पाच दिवस शेतमजुराच्या वेशात
कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम चोपडे आणि पोलिस निरीक्षक जी. गमे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक नांदेडला रवाना झाले. आरोपीबाबत कोणताही तांत्रिक पुरावा उपलब्ध नसतानाही पोलिसांनी पारंपरिक तपास पद्धतीचा अवलंब केला. संबंधित परिसरात सलग पाच दिवस शेतमजुराच्या वेशात राहून पोलिसांनी आरोपीची हालचाल टिपली. शेतमजूर म्हणून वावरताना दीपक याची ओळख पटवली. योग्य संधी साधत पोलिसांनी दीपक करकडे याला ताब्यात घेत बेड्या ठोकल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.