धामोते स्मशानभूमीची दयनीय अवस्था
ग्रामस्थांची तीव्र नाराजी
कर्जत, ता. २६ (बातमीदार) : कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या धामोते येथील स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय बनली असून, ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे शेड नसल्याने विशेषतः पावसाळ्यात अंत्यविधी करताना नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. उन्हाळा आणि इतर काळातही मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या मर्यादित असली तरी अनेक वर्षांपासून स्मशानभूमीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या परिसरात ग्रामपंचायतीच्या मालकीची सुमारे १५ गुंठे जागा उपलब्ध असून, योग्य नियोजन व मोजणी करून येथे विकासकामे करता येऊ शकतात. मात्र, प्रशासनाकडून याकडे कोणतेही ठोस पाऊल उचलले गेलेले नाही.
दरम्यान, कोल्हारे ग्रामपंचायत विकासाच्या मार्गावर असल्याचे सांगितले जात असताना धामोते गावातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये वाढत आहे. परिसरात बांधकामे वाढत असताना आवश्यक सुविधांची उपेक्षा होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
सोशल मीडियावरही या प्रश्नाला वाचा फोडली जात असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन स्मशानभूमीची दुरुस्ती करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
कोट
गेल्या पाच वर्षांपासून सरपंचांकडे मागणी केली होती. मात्र, कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम असून, निधीही उपलब्ध आहे. संबंधित ग्रामपंचायत जागेची मोजणी करून तात्काळ काम सुरू करता येईल. मात्र, काही चुकीच्या मानसिकतेमुळे ही कामे रखडून ठेवली जात आहेत.
- विजय रामचंद्र हजारे, कोल्हारे ग्रामपंचायत प्रशासकीय समिती सदस्य
कोट
सदरची स्मशानभूमीची जागा खासगी मालकीची असल्याने या ठिकाणी दुरुस्ती कामे करण्यास विरोध आहे. ग्रामपंचायत मालकीच्या जागेमध्ये बांधण्यास काही ग्रामस्थ यांचा भावनिक विरोध आहे, पूर्वापार असलेली स्मशानभूमी हलवण्यास विरोध आहे. ग्रामपंचायत जागेत बांधायची असल्यास ती जागा नदीकडे असल्याने त्या भागात पावसाळ्यात पुराच्या पाण्याचा अडथळा येऊ शकतो.
- संजय राठोड, ग्रामसेवक, कोल्हारे ग्रामपंचायत
(फोटो : फोनवर बोलणारे ग्रामसेवक, आणि लाल बॅकग्राउंड आणि मिशी नसलेले, सफेद शर्ट विजय हजारे आहेत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.