पाणी बचतीचे आवाहन
एल निनो पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचा इशारा; मोरबे धरणातील साठा मर्यादित
वाशी, ता. २५ : संभाव्य ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा जपून व जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे. मोरबे धरणातील उपलब्ध पाणीसाठा, अपेक्षित कमी पर्जन्यमान आणि पुढील वर्षाचे नियोजन लक्षात घेता पाणी बचत अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महापौर सुजाता पाटील व नगरसेवकांच्या उपस्थितीत झालेल्या एप्रिल महिन्याच्या तहकूब महासभेत आयुक्तांनी शहरातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती मांडली. नवी मुंबईला मोरबे व बारवी धरणांमधून पाणीपुरवठा होत असून, मोरबे धरणाची एकूण क्षमता १९०.८९० एमसीएम आहे. सध्या धरणात ८२.५५७ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ४३.२४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यामधील राखीव साठा वगळता प्रत्यक्ष वापरासाठी ५१.९५७ एमसीएम (२७.२२ टक्के) पाणी उपलब्ध असून, हा साठा ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत, म्हणजेच सुमारे १०३ दिवस पुरेल, अशी माहिती त्यांनी दिली.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा ‘एल निनो’मुळे पावसाचे प्रमाण ९२ ते ९४ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता आहे. मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी सरासरी ३५०० मिमी पाऊस आवश्यक असताना यंदा केवळ ३३२७ मिमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या पाणीपुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वाहन धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरणे टाळावे, पाण्याच्या टाक्या ओसंडून वाहू नयेत याची काळजी घ्यावी आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. तसेच नगरसेवकांनी आपल्या प्रभागात जनजागृती करण्याचे निर्देशही देण्यात आले.
चौकट
मर्यादित पाणीसाठा
मोरबे धरणात सध्या ४३.२४ टक्के साठा असून, प्रत्यक्ष वापरासाठी २७.२२ टक्के पाणी उपलब्ध आहे. हा साठा केवळ ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत पुरेल, त्यामुळे पाणी बचत आवश्यक आहे.
नियोजन महत्त्वाचे
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असून, अपेक्षित ३,५०० मिमीऐवजी सुमारे ३,३२७ मिमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील वर्षासाठीही नियोजन करणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.