बेकायदा खतविक्रीचा भांडाफोड
शिरोशी परिसरात प्रशासनाची कारवाई
पालघर, ता. २७ ः जव्हार तालुक्यातील शिरोशी परिसरात बेकायदा खतविक्रीचा भांडाफोड करण्यात आला आहे. या प्रकरणात टेम्पोसह एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.
गुजरात भरूच येथील ओम साई फर्टीलायझर नामक संस्थाच्या नावे बेकायदेशीर खत शेतकऱ्यांना विकत असल्याची तक्रार उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. कायदेशीर परवानगी नसताना हा प्रकार सुरू असल्याने स्थानिक परवानाधारक विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच शेतकऱ्यांना निकृष्ट किंवा चुकीच्या दर्जाच्या खताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पादनावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
------------------------
आगाऊ पैशांची आकारणी
तालुका कृषी अधिकारी यांनी सहायक कृषी अधिकारी सुनील महाले, गुणनियंत्रण कृषी अधिकारी रामु माळी,पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रणीत उपाध्ये, पोलिस कर्मचारी एस भोगाडे, आर. जाधव यांच्या पथकाने विकास अनुरागीला ताब्यात घेतले. साकुर, आटकर, कळमविरा, रामखिंड येथे खत विक्री केल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच शेतकऱ्यांकडून आगाऊ पैसे घेतल्याची माहिती आहे.