सर्वसाधारण सभेत ‘लक्षवेधी’वर गंडांतर!
जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होत नसल्याचा आरोप
विषयपत्रिकेबाहेरील चर्चेला सभागृहात ब्रेक
पनवेल, ता. २७ (बातमीदार) ः पनवेल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये लोकप्रतिनिधींना जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी असलेले ‘लक्षवेधी’ हे माध्यमच दुय्यम ठरत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. शहरातील पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, नागरी सुविधा यांसारखे महत्त्वाचे आणि तातडीचे प्रश्न विरोधकांसह सत्ताधारी गटातील सदस्यांकडून लक्षवेधीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्याने नाराजी पसरली आहे.
सर्वसाधारण सभेमध्ये विषयपत्रिकेतील विषयांव्यतिरिक्त सदस्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून तातडीचे मुद्दे उपस्थित करण्याची परंपरा आहे. त्यासाठी संबंधित विषयाची लेखी सूचना नगर सचिवांकडे आगाऊ द्यावी लागते. मात्र त्या सूचनांना चर्चेसाठी परवानगी द्यायची की नाही याचा अंतिम अधिकार पीठासन अधिकारी म्हणजे महापौरांकडे असतो. मागील काही सभांमध्ये विषयपत्रिकेतील मुद्द्यांवर चर्चा आणि मंजुरी देण्यात आली, काही विषय स्थगित ठेवण्यात आले; मात्र विषयपत्रिकेबाहेरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी दिलेल्या लक्षवेधी सूचनांना महापौरांकडून मंजुरी मिळत नसल्याने लोकप्रतिनिधींमध्ये, विशेषतः विरोधकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
सदस्यांमध्ये नाराजी
१. काँग्रेसचे नगरसेवक हरेश केणी यांनी पाणीटंचाई आणि शहरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत लक्षवेधी सूचना सादर केली होती. २४ एप्रिलला झालेल्या सर्वसाधारण सभेतही त्यांनी हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची लक्षवेधी फेटाळण्यात आली आणि त्या विषयावर चर्चा घेण्यास परवानगी नाकारण्यात आली.
२. सत्ताधारी बाकावरील काही नगरसेवकांनीही आपापल्या प्रभागातील प्रश्न मांडण्यासाठी लक्षवेधी सूचना दिल्या होत्या. त्यादेखील चर्चेसाठी न आल्याने नाराजी पसरली आहे.
लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न मांडणे हा प्रत्येक सदस्याचा अधिकार आहे. पाणी आणि रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत मी लक्षवेधी मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र महापौरांनी चर्चा घेण्यास परवानगी दिली नाही. सत्ताधाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांची जाणीव नाही. पाण्याची तीव्र टंचाई आहे तसेच मागील वर्षी रस्त्यांची झालेली दुरवस्था सर्वांनाच माहीत आहे. या विषयांवर चर्चा होऊन उपाययोजना काय होणार हे जाणून घेण्यासाठीच आम्ही लक्षवेधी मांडतो, पण त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.
- हरेश केणी, नगरसेवक, पनवेल महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.