उल्हासनगर, ता. २७ (बातमीदार) : शहरात मीटर रिक्षांपेक्षा शेअरिंग रिक्षांचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी त्यावरच अवलंबून राहावे लागते. सात हजारांहून अधिक शेअरिंग रिक्षा धावत असल्याचा अंदाज असून, त्यापैकी ४० टक्के रिक्षाचालक अमराठी आहेत. यामध्ये सिंधी, उत्तर भारतीय; तसेच इतर राज्यांतील चालकांचा समावेश आहे. मात्र, मीटर रिक्षा नसल्याने प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जात आहे.
शहरातील विविध भागांसह कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर येथे स्वतंत्र जाण्यासाठी रिक्षा घेतल्यास काही चालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जाते. मीटर प्रणालीचा अभाव असल्याने प्रवाशांची सर्रास लूट होते, अशी तक्रार नागरिकांची आहे. उद्योगप्रधान शहर असल्याने येथे व्यापारी व कामगारांची मोठी वर्दळ आहे. पार्किंगची समस्या आणि अरुंद रस्त्यांमुळे अनेक जण शेअरिंग रिक्षांनाच प्राधान्य देतात. शहाड, विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात मीटर रिक्षा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना शेअरिंगवरच अवलंबून राहावे लागते. उल्हासनगरात ६० टक्के रिक्षाचालक मराठी भाषिक असून उर्वरित ४० टक्क्यांत सिंधी, उत्तर भारतीय, बिहारी व दक्षिण भारतीय चालकांचा समावेश आहे. बहुतांश चालक मराठी व हिंदी भाषेत संवाद साधत असतात.
रिक्षाचालकांना मराठी अनिवार्य
शहीद मारोती जाधव रिक्षाचालक-मालक संघटनेचे अध्यक्ष शेखर यादव यांनी सांगितले, शहरात काम करणाऱ्या इतर भाषिक चालकांनी मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करावा. काही चालकांचे शिक्षण महाराष्ट्रात झाल्याने ते प्रवाही मराठी बोलतात. मात्र, ज्यांना मराठी येत नाही, त्यांनी उपजीविकेसाठी ती शिकणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, मीटर रिक्षा सेवा सुरू करणे, भाडे नियंत्रणासाठी नियम लागू करणे आणि मनमानी कारभारावर आळा घालणे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.