उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्य विभागाचा इशारा
पालघर जिल्हा परिषदेचे आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन
पालघर, ता. २७ (बातमीदार) : जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे अति उष्णतेची लाट जाणवत असून नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद पालघरच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक, कामगार तसेच जोखमीच्या गटातील व्यक्तींनी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांनुसार दिवसभर पुरेसे पाणी पिणे अत्यंत आवश्यक असून, तहान लागण्याची वाट न पाहता नियमित पाणी प्यावे. प्रवासादरम्यान पिण्याचे पाणी सोबत ठेवावे तसेच फळे आणि द्रव पदार्थांचे सेवन वाढवावे. हलक्या रंगाचे सैल कपडे परिधान करावेत आणि बाहेर जाताना डोके झाकण्यासाठी टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा. शक्यतो दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर जाणे टाळावे.
घरामध्ये थंडावा टिकवण्यासाठी पडदे व शटरचा वापर करावा तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. शरीर थंड ठेवण्यासाठी ओल्या कापडाचा वापर करणे, पाण्याने अंग पुसणे किंवा पाय थंड पाण्यात ठेवणे उपयुक्त ठरते, असेही सांगण्यात आले. हवामानाच्या अद्ययावत माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले असून, उष्णतेच्या काळात शक्यतो सावलीत राहावे आणि बाहेरील कामे सकाळी किंवा संध्याकाळी नियोजित करावीत.
-------------
विशेष काळजी घ्यावी
लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला, बाहेर काम करणारे कामगार तसेच आजारांनी ग्रस्त व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. उष्णतेशी जुळवून घेण्यासाठी कामाचे प्रमाण हळूहळू वाढवावे आणि भरपूर पाणी प्यावे, असेही सूचित करण्यात आले आहे. दुपारच्या कडाक्याच्या उन्हात बाहेर पडणे, अनवाणी चालणे तसेच मद्य, चहा आणि कॉफीचे अतिसेवन टाळावे. पार्क केलेल्या वाहनात लहान मुले किंवा पाळीव प्राणी ठेवणे अत्यंत धोकादायक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
---------------
जागरूक राहण्याचे आवाहन
उष्णतेमुळे चक्कर येणे, मळमळ, जास्त तहान, थकवा, स्नायूंमध्ये गोळे येणे आणि हृदयाचे ठोके वाढणे अशी लक्षणे दिसू शकतात. गंभीर स्थितीत उष्माघात होण्याची शक्यता असल्याने अशी लक्षणे आढळल्यास त्वरित थंड ठिकाणी जाऊन विश्रांती घ्यावी. पाणी किंवा ओरल रिहायड्रेशन द्रावण घ्यावे आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय मदत घ्यावी, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. उष्णतेशी संबंधित आजार टाळता येऊ शकतात. नागरिकांनी वेळेवर खबरदारी घेतल्यास गंभीर परिणाम टाळता येतील. त्यामुळे सर्वांनी जागरूक राहून स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद पालघर आरोग्य विभागाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.