उल्हासनगर, ता. २८ (वार्ताहर) : उल्हासनगर कॅम्प क्रमांक ४ मधील ओ.टी. सेक्शन ते व्हिनस चौक हा मुख्य बाजारपेठेचा गजबजलेला रस्ता सध्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मात्र, या समस्येवर लवकरच कायमस्वरूपी तोडगा निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार या रस्त्याचे ६० फूट रुंदीकरण करण्याची प्रक्रिया हाती घेतली जाणार असून अतिक्रमणे हटवण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.
हा रस्ता शहरातील अत्यंत वर्दळीचा व व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक, ग्राहक आणि वाहनांची ये-जा येथे होत असते. मात्र, अनेक वर्षांत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेल्या अतिक्रमणांमुळे रस्त्याची रुंदी कमी होत गेल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. नव्या विकास आराखड्यानुसार या रस्त्याची रुंदी ६० फूट प्रस्तावित असली तरी सध्या अतिक्रमणांमुळे ती केवळ ३० फुटांपर्यंत मर्यादित आहे. त्यामुळे कॅम्प क्रमांक चार आणि पाचमधील नागरिकांसह व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सततच्या कोंडीमुळे वायू व ध्वनीप्रदूषणातही वाढ झाल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. काही ठिकाणी दुकानदारांनी लोखंडी जाळ्या व शेड उभारून पदपथावर अतिक्रमण केले आहे.
पुनर्वसन विचाराधीन
स्थानिक शिवसेना नगरसेवक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले की, वाढती वाहतूक लक्षात घेता हा रस्ता किमान ६० फूट रुंद होणे अत्यावश्यक आहे. मात्र, या प्रक्रियेत दुकानदारांचे नुकसान होणार नाही, याचीही काळजी घेतली जाईल. व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी जगदीश तेजवानी यांनी सांगितले की, रस्ता रुंदीकरणासाठी सुमारे १५० दुकानदारांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे.
नगररचना विभागाकडून रस्त्याचे मोजमाप करून अतिक्रमणे हटवण्याची प्रक्रिया राबवली जाईल. त्यानंतर विकास आराखड्यानुसार रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. भविष्यात या भागातील वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
- नीलेश शिरसाठे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.