हापूस आणि केशर आंबा दाखल
फळ संकलन केंद्रात फळाच्या राजाची आवक वाढली
वाणगाव, ता. २८ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी भागातील केशर आणि हापूस आंबा हा फळ संकलन केंद्रात दाखल झाला आहे. पालघरकरांना आता मे महिन्याच्या आधीच स्थानिक जातीच्या केशर व हापूसची चव चाखायला मिळणार आहे. फळ संकलन केंद्रात फळांच्या राजाची आवक वाढली असल्याची माहिती कृषिभूषण यज्ञेश सावे यांनी दिली.
दक्षिण कोकणाच्या तुलनेत उत्तर कोकणात आंब्याचा हंगाम हा उशिरा सुरू होत असला तरी साधारणतः अक्षय तृतीयेला फळे बाजारात येतात. यंदा साडेतीन मुहूर्ताचे औचित्य थोडक्यात हुकले तरी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्याचा मुहूर्त साधला आहे. तलासरी तालुक्यातील बोरीगावचे कृषिभूषण यज्ञेश सावे यांच्या सावे फार्म या आंबा संकलन केंद्रावर रविवार (ता. २६) पासून शेतकऱ्यांकडून फळे खरेदीला प्रारंभ झाला आहे. येथे केसर व हापूस फळांची खरेदी केली जात आहे. फळांची जात आणि प्रतवारीनुसार शेतकऱ्यांना भाव दिला जातो, तर हेच सूत्र ग्राहकांसाठीही अवलंबले जाते.
गुजरातप्रमाणेच पालघर जिल्ह्यात केशर आंब्याचे उत्तम पीक येते. तुलनेने या जातींचे लागवड क्षेत्र अन्य फळांच्या जातींपेक्षा अधिक आहे. चवीला गोड आणि मागणी अधिक असल्याने हापूसची लागवडही दिसते. प्रतिकिलो हापूसला भाव अधिक मिळतो, असे शेतकरी सांगतात. पुढील काही दिवसांत अन्य जातींच्या फळांचा ओघ वाढेल, अशी माहिती फळ संकलन केंद्रचालकांनी दिली.
दरम्यान, गेल्या वर्षी उशिरापर्यंत झालेला पाऊस, झाडे मोहोरल्यानंतर विपरीत परिस्थितीमुळे मोहोर करपणे व फळगळीने उत्पादन तुलनेने कमी आहे. याशिवाय एप्रिल महिन्यात उन्हाचा पारा ४० अंशांच्या जवळ पोहोचल्याने आंब्याचा बाजार कसा राहील, याकडे उत्पादक व संकलन केंद्रांची नजर असेल, तर स्थानिक फळे बाजारात आल्याने खवय्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उन्हाळी हंगामात येथे येणाऱ्या पर्यटकांना मेच्या मध्यात फळांचा चांगला आस्वाद घेता येईल. शेतकऱ्यांनाही त्यामुळे फायदा होईल.
----------------
डहाणू आणि तलासरी तालुक्यातील आंबा उत्पादकांनी संकलन केंद्रांवर फळे आणण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात फळांची आवक कमी असली तरी मे महिन्याच्या प्रारंभी त्यामध्ये वाढ होईल. मेच्या मध्यात आवक वाढून आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्यात येईल, या काळात येणाऱ्या पर्यटकांनाही चव चाखता येईल.
- यज्ञेश सावे, आंबा संकलन केंद्र, तलासरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.