तुर्भे क्षेपणभूमीवरील सातवा सेल हिरवळीने नटणार
४२ लाखांच्या जलसिंचन योजनेला मान्यता; पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर
वाशी, ता. २८ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे क्षेपणभूमी येथे शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यात येणाऱ्या सातव्या सेलवरील हिरवळीच्या संवर्धनासाठी जलसिंचन व्यवस्था उभारण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. या कामासाठी सुमारे ४२.१४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, कामाचा कालावधी १२ महिने निश्चित करण्यात आला आहे.
नवी मुंबईत निर्माण होणाऱ्या नागरी घनकचऱ्याच्या शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी तुर्भे येथे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित आहे. या प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या आठ सेलपैकी सातव्या सेलची क्षमता पूर्ण झाल्याने तो शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या सेलवर व सभोवतालच्या परिसरात हिरवळ विकसित करण्यासाठी जलसिंचन व्यवस्था उभारणे आवश्यक ठरणार आहे. महापालिका आयुक्तांनी केलेल्या पाहणी दौऱ्यात सातव्या सेल परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व हिरवळ निर्माण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सुमारे ३६ हजार चौरस मीटर क्षेत्रावर हिरवळ विकसित करण्यात येणार असून, या हिरवळीच्या संवर्धनासाठी पुनर्प्रक्रिया करण्यात आलेल्या पाण्याचा वापर करण्याची योजना आखण्यात आली आहे. महापालिकेच्या टर्शियरी ट्रीटमेंट प्लांटमधील पाणी जलवाहिनीद्वारे या ठिकाणी पुरविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे तुर्भे क्षेपणभूमी परिसरात पर्यावरणपूरक हिरवळ विकसित होऊन परिसराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. पटलावर हा विषय आल्यानंतर नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी उर्वरित सेलमध्ये हिरवळ का करण्यात येत नाही, असा सवाल उपस्थित केला. या वेळी अशोक पाटील यांनी प्रशासनाला उर्वरित ठिकाणी हिरवळ करण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करावा, असे सूचित केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.