सोन्याचा साज घेऊन बहावा बहरला
उरणच्या माळरानात निसर्गाची पिवळीधमक उधळण
उरण, ता. २८ (बातमीदार) ः नैसर्गिक सौंदर्याची खाण लाभलेल्या कोकणातील माळरान, डोंगरदऱ्या आणि गावखेड्यातील रानमोडी रस्त्यांवर सध्या निसर्गाच्या विविध रंगांची उधळण सुरू आहे. ग्रीष्माच्या तप्त लहरींचा सामना करत असतानाच, सोनेरी पिवळ्या रंगांच्या साजाने बहरलेल्या बहावा वृक्षाने निसर्गप्रेमींना भुरळ घातली आहे. उन्हाच्या झळांमध्ये हा वृक्ष जणू सोन्याची उधळण करत असल्याचा भास होत आहे.
बहावा हा कोकण किनारपट्टीतील एक महत्त्वाचा रानवृक्ष आहे. हिरव्यागार पानांच्या घोळक्यात फिक्कट पिवळ्या खोडाचा हा वृक्ष ऐन उन्हाळ्यात लांबच लांब फुलांच्या घोसांनी सजून जातो. सह्याद्रीच्या कुशीतील डोंगर रांगांमध्ये ऐन उन्हाळ्यात बहावा बहरतो. तेव्हा त्याचे मोहक सौंदर्य पर्यटकांच्या आणि वाटसरूंच्या डोळ्यांचे पारणे फेडते. पिवळ्या कोमल फुलांच्या लांबच लांब घोसाने हा वृक्ष सजून जातो.
बहावा फक्त सौंदर्याचे प्रतीक नाही, तर आपल्या आजारांवर असणारे रामबाण औषध असल्याने हा वृक्ष संजीवनी समान आहे. मधल्या काळात वृक्षतोड होत असताना बहाव्याची पण कत्तल झाली. मात्र, सध्याच्या निसर्गप्रेमींना बहाव्याच्या सौंदर्याने भुरळ घातल्याने सध्या गावखेड्यातील रस्त्यांबरोबरच शहरातील बागांमध्ये हा वृक्ष आपल्या सौंदर्याची उधळण करताना दिसत आहे.
वृक्षाचे आयुर्वेदिक महत्त्व
१ आयुर्वेदात बहावा वृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बहाव्याच्या शेंगांचा गर पोट साफ करण्यासाठी, मळ मऊ करण्यासाठी आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो.
२ याच्या पानांचा आणि फुलांचा लेप खाज, त्वचेची जळजळ, नायटा आणि इतर त्वचारोगांवर गुणकारी आहे.
३ बहावा पित्त आणि कफ कमी करतो.
४ पोटदुखी, अपचन आणि गॅसची समस्या दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो.
५ हा कावीळ आणि यकृताच्या इतर समस्यांवर रामबाण उपाय आहे.
६ जखमा लवकर भरून काढण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी याच्या पानांचा लेप लावतात.
७ याच्या मुळ्यांचा काढा घशाच्या गाठी आणि खोकल्यासारख्या श्वसनाच्या विकारांवर अत्यंत गुणकारी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.