ठाणे अंतर्गत मेट्रोवर ‘पीएमओ’ची नजर
प्रगती पोर्टलद्वारे प्रकल्पाचे मॉनिटरिंग; भ्रष्टाचाराला बसणार चाप
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ ः शहराच्या वाहतूक कोंडीवर जालीम उपाय प्रस्तावित असलेल्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला अखेर सुरुवात झाली आहे. २९ किमीचा टप्पा गाठणारा आणि सुमारे १२ हजार कोटींचा हा प्रकल्प ठाण्यासाठी महत्त्वाकांक्षी मानला जात आहे. मात्र त्यावर थेट पंतप्रधान कार्यालयाची (पीएमओ) नजर असणार आहे.
केंद्र सरकारच्या ‘प्रगती’ प्लॅटफॉर्मवर या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत पीएमओ कार्यालय या प्रकल्पाचा आढावा घेणार असल्याने महामेट्रो आणि ठाणे महापालिकेने कामाचा वेग वाढवला आहे. दरम्यान, पीएमओच्या एण्ट्रीमुळे प्रकल्पातील संभाव्य भ्रष्टाचार आणि प्रशासकीय दिरंगाईला चाप बसणार असल्याचे संकेत मिळत आहेत. नवी दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रात पहिल्यांदाच अंतर्गत मेट्रोचा प्रकल्प ठाण्यात आकार घेत आहे. ठाणे महापालिकेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असला तरी त्याचे संपूर्ण काम महामेट्रो करणार आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी देण्यात आला असून, एकूण १२ हजार कोटींच्या पुढे या प्रकल्पाचा खर्च होणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामालाही सुरुवात झाली आहे. घोडबंदरजवळ सध्या पाया रचण्याचे काम सुरू असून, २०२९ पर्यंत ही अंतर्गत मेट्रो ठाणेकरांच्या प्रवासासाठी सज्ज होईल, या दिशेने गती देण्यात येणार आहे.
१२ हजार कोटींचा हा प्रकल्प असल्याने त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आणि भ्रष्टाचार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याची कुणकूण पंतप्रधान कार्यालयापर्यंत गेल्याचे समजते. म्हणूनच त्याला चाप बसवण्यासाठी संभाव्य गैरव्यवहारांवर थेट लक्ष देण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. परिणामी हा प्रकल्प आता ‘प्रगती’ (प्रो अॅक्टिव्ह गव्हर्नन्स अॅण्ड टाइमली इम्प्लिमेंटेशन) पोर्टलवर आणण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्याचा अहवाल थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचणार आहे. पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाल्याने येत्या दोन-तीन दिवसांत पीएमओकडून या प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार असल्याचे वृत्त आहे. यामुळे महामेट्रो आणि ठाणे महापालिकेच्या प्रशासनावर कामाचा वेग वाढवण्यासाठी दबाव निर्माण झाला आहे.
अंतर्गत मेट्रोत २२ स्थानके
- एकूण २९ किमीची ही अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो असून, एकूण २२ स्थानके असणार आहेत.
- रायलादेवी, वागळे चौक, लोकमान्यनगर बस डेपो, छत्रपती शिवाजी महाराज नगर, नीळकंठ टर्मिनल गांधीनगर, आझादनगर बस डेपाे, मनोरमानगर, कोलशेत, बाळकूम नाका, राबोडी, ठाणे जक्शन, नवीन ठाणे हे मुख्य थांबे असणार आहेत.
- डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजय नगरी, वाघबीळ आणि पातलीपाडा या निवसी क्षेत्रातूनही ही अंतर्गत मेट्रो धावणार आहे.
- यामध्ये २० उन्नत तर दोन भुयारी मार्गांचा समाावेश असून, २०२९मध्ये अंदाजे सात लाख प्रवाशांना रोजचा प्रवास देणारी ही अंतर्गत मेट्रो ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
---
विरोधाचीही धार
एकीकडे पीएमओ लक्ष घालत असतानाच दुसरीकडे पर्यावरणवादी आणि नगररचना अभ्यासकांनी या प्रकल्पाच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ठाण्याला खरोखरच वर्तुळाकार मेट्रोची गरज नसल्याचे सांगत काही तज्ज्ञांनी याला पांढरा हत्ती म्हटले आहे. दरम्यान, घोडबंदर भागातील नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविण्यास सुरुवात केली असून, नुकतीच त्यांनी भाजप आमदार संजय केळकर यांची भेट घेतली. या वेळी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.