रामनगरमधील मुख्य गटार खचले; दुरुस्ती न झाल्यास दुर्घटनेची भीती
घाटकोपर, ता. ४ (बातमीदार) : घाटकोपर पश्चिम येथील रामनगर (अ) परिसरात शंकर मंदिराशेजारील मुख्य गटार खचल्याने परिसरात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक दिवसांपासून देखभाल न झाल्यामुळे गटारात गाळ आणि कचऱ्याचा साठा वाढला असून, ते वारंवार तुंबत आहे. परिणामी सांडपाणी आणि कचरा थेट रस्त्यावर येत आहे.
या परिस्थितीचा सर्वाधिक फटका स्थानिक नागरिक आणि पादचाऱ्यांना बसत आहे. रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्यातून नागरिकांना मार्ग काढावा लागत असून, आरोग्याच्या दृष्टीने ही बाब गंभीर मानली जात आहे. दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
खचलेल्या गटारासमोरच संपूर्ण परिसराला पाणीपुरवठा करणारी मोठी पाण्याची टाकी असल्याने नागरिकांची चिंता अधिक वाढली आहे. गटारातील दूषित पाणी टाकीत मिसळण्याची शक्यता व्यक्त होत असून, त्यामुळे हजारो नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
दरम्यान, काही दिवसांत पावसाळा सुरू होणार असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. पावसाच्या पाण्यासोबत गटारातील घाण रस्त्यावर ओसंडून वाहू शकते. त्यामुळे अपघातांचा धोकाही वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते केतन भोज यांनी मनपा ‘एन’ विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना लेखी निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. खचलेल्या गटाराची त्वरित दुरुस्ती करून त्यावर मजबूत लोखंडी जाळी बसवावी, तसेच नियमित साफसफाईची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. पावसाळ्यापूर्वी या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त होत असून, प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.